बँकेचे सील तोडून जप्त घरात प्रवेश; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल

मेहरूण येथील न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त करण्यात आलेल्या घराचे बँकेचे सील तोडून अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी आयडीबीआय बँकेच्या तक्रारीवरून जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

कर्ज थकबाकीमुळे जप्त केलेल्या घराचे सील तोडल्याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; पुढील तपास सुरू.

 न्यायालयाच्या आदेशानुसार बँकेने जप्त केलेल्या घरावरील सील तोडून अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहरूण शिवारातील एफ.ए. रत्नमाला रेसिडेन्सी, प्लॉट क्रमांक ५२, सर्व्हे क्रमांक १६७/२ येथील घरासाठी विशाल गजानन डुकरे आणि आशा गजानन डुकरे यांनी आयडीबीआय बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित मालमत्ता जप्त करण्यात आली होती.

त्यानंतर बँकेने घराला सील लावून नोटीसही चिकटवली होती. मात्र, २३ जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास संबंधित दाम्पत्याने बँकेची कोणतीही परवानगी न घेता घरावरील सील आणि नोटीस तोडून घरात प्रवेश केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांनी कुटुंबासह त्या घरात वास्तव्यास सुरुवात केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी आयडीबीआय बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक हंसराज कुंदनलाल राजपाल (वय ४७) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून विशाल गजानन डुकरे आणि आशा गजानन डुकरे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२९(४), २२३ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास जळगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!