मनपाची अनधिकृत जाहिरात फलकांवर धडक कारवाई; भंगाळे गोल्ड, बिर्ला गोल्ड, अदानीसह बड्या कंपन्यांचे १९० बोर्ड जप्त

जळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करत भंगाळे गोल्ड, बिर्ला गोल्ड, अदानीसह विविध कंपन्यांचे १९० पेक्षा अधिक जाहिरात बोर्ड जप्त केले.

जळगाव शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांवर मनपाचा दणका. एनओसीशिवाय लावलेले बोर्ड जप्त; नियमभंग करणाऱ्यांना कठोर इशारा.

 शहर सुशोभीकरणाच्या नावाखाली नियमांचे उल्लंघन करून लावण्यात आलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांवर जळगाव महानगरपालिकेने मोठी कारवाई केली आहे. मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरात धडक मोहीम राबवत भंगाळे गोल्ड, बिर्ला गोल्ड, अदानी आणि आर एल ग्रुप यांसारख्या नामांकित संस्थांचे १९० पेक्षा अधिक जाहिरात बोर्ड जप्त केले आहेत. या कारवाईमुळे अनधिकृत जाहिरातदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभीकरण करण्यासाठी मनपाने जाहिरातदारांसाठी काही अटी व शर्ती निश्चित केल्या होत्या. त्यानुसार जाहिरात फलकांवर ६० टक्के जागा संबंधित कंपनीच्या जाहिरातीसाठी आणि २० टक्के जागा महानगरपालिकेच्या शासकीय जाहिरातींसाठी राखीव ठेवणे बंधनकारक होते. तसेच जाहिरात फलक लावण्यासाठी मनपाची ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) घेणे आवश्यक होते.

मात्र, संबंधित जाहिरातदारांनी या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यानंतर मनपा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, नोटिसीनंतरही नियमांचे पालन न झाल्याने अखेर मनपाने थेट कारवाई करत फलक जप्त केले.

शहरातील विविध भागांत कारवाई

  • मनपाच्या पथकांनी मंगळवारी सकाळपासून शहरातील विविध भागांत एकाच वेळी कारवाई सुरू केली.
  • नेहरू चौक ते रेल्वे स्टेशन मार्ग :मनपा प्रशासकीय इमारतीसमोरून रेल्वे स्टेशनपर्यंतच्या मार्गावर बिर्ला गोल्ड आणि अदानी कंपनीचे सुमारे ७० ते ७५ जाहिरात फलक जप्त करण्यात आले.
  • स्टेडियम ग्राउंड ते गांधी बगीचा मार्ग : या भागात भंगाळे गोल्ड कंपनीचे नियमबाह्य लावण्यात आलेले ८० ते ९० जाहिरात फलक मनपाने हटवून ताब्यात घेतले.
  • चित्रा चौक ते झाशी राणी पुतळा मार्ग :या परिसरात आर एल ग्रुपचे ३० ते ४० जाहिरात फलक जप्त करण्यात आले.

नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या आणि मनपाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यावसायिकाची गय केली जाणार नाही, असा इशारा महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे. अनधिकृत जाहिरात फलकांविरोधातील ही मोहीम आगामी काळात आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!