गॅस सेवा बंद होईल अशी भीती दाखवून सायबर फसवणुकीची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
गॅस जोडणीचे खाते नूतनीकरण न केल्यास गॅस सेवा बंद होईल, अशी भीती दाखवून सायबर भामट्यांनी मध्य रेल्वेतील एका लोकोपायलटची ५ लाख ४ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी सोमवारी (२७ जुलै) कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
तक्रारदार शंकरकुमार डोमनसिंग (वय ५०) हे कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात कुटुंबासह राहतात. ते मध्य रेल्वेत लोकोपायलट म्हणून कार्यरत आहेत.
तक्रारीनुसार, सुमारे वीस दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीने संपर्क साधून स्वतःला एचपी गॅस एजन्सीचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले. गॅस जोडणीचे खाते नियमित करण्यासाठी नूतनीकरण आवश्यक असून, ते न केल्यास गॅस सेवा बंद केली जाईल, असे सांगत केवळ १० रुपये ऑनलाइन भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर एक लिंक पाठवून त्यामधील माहिती भरून पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
डोमनसिंग यांनी ऑनलाइन व्यवहार करण्याचा प्रयत्न केला असता तो पूर्ण झाला नाही. त्यानंतर भामट्याच्या सांगण्यावरून त्यांनी ५० रुपयांचा दुसरा व्यवहार केला. उर्वरित ४० रुपये परत मिळविण्यासाठी पाठविलेल्या लिंकवर क्लिक करताच त्यांच्या बँक खात्यातून ४ हजार ९०१ रुपये वजा झाले.
यानंतर त्यांनी तातडीने बँकेशी संपर्क साधून सर्व ऑनलाइन व्यवहार बंद करण्याची विनंती केली. मात्र, दोन दिवसांनी हॉटेलचे बिल भरण्यासाठी मोबाईल वापरत असताना त्यांच्या खात्यातून दोन वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे ३ लाख आणि २ लाख रुपये अशा एकूण ५ लाख रुपयांची रक्कम दुसऱ्या बँक खात्यात वर्ग झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याप्रकरणी गॅस कनेक्शनचे नूतनीकरण करण्याच्या बहाण्याने एकूण ५ लाख ४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार डोमनसिंग यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून सायबर फसवणुकीचा पुढील तपास सुरू केला आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
