संप बेस्टचा, फायदा मेट्रोचा; मेट्रो-३ वर प्रवासी संख्येचा नवा उच्चांक

मुंबईतील बेस्ट बससेवा ठप्प झाल्याने नागरिकांनी मेट्रोकडे मोठ्या प्रमाणात वळण घेतले. आरे ते कफ परेड मेट्रो-३ मार्गिकेवर एका दिवसात २ लाख ३३ हजार ८५८ प्रवाशांची विक्रमी नोंद झाली.

बेस्टच्या बेमुदत संपामुळे मुंबईकरांनी मेट्रोकडे मोर्चा वळवला. मेट्रो-३ सह मेट्रो-१, २अ, २ब, ७ आणि ९ मार्गिकांवरील प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली.

 बेस्टच्या १२ कर्मचारी संघटनांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संपाचा शुक्रवारी मुंबईतील दैनंदिन वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. बससेवा विस्कळीत झाल्याने नागरिकांनी पर्यायी वाहतुकीसाठी मेट्रो सेवांकडे मोठ्या प्रमाणात वळण घेतले.

या परिस्थितीचा सर्वाधिक फायदा आरे ते कफ परेड या भुयारी मेट्रो-३ मार्गिकेला झाला. शुक्रवारी या मार्गिकेने दैनंदिन प्रवासी संख्येचा नवा उच्चांक नोंदवत पहिल्यांदाच दोन लाखांचा टप्पा ओलांडला. दिवसभरात तब्बल २ लाख ३३ हजार ८५८ प्रवाशांनी मेट्रो-३ मार्गिकेवर प्रवास केला.

ही मार्गिका पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर प्रथमच प्रवासी संख्या दोन लाखांच्या पुढे गेल्याची नोंद झाली आहे. बेस्ट संपामुळे रस्त्यांवरील बससेवा मोठ्या प्रमाणात बंद असल्याने नागरिकांनी वेगवान आणि पर्यायी वाहतूक म्हणून मेट्रोला प्राधान्य दिले.

दरम्यान, मुंबईतील इतर मेट्रो मार्गिकांवरही प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो-१ मार्गिकेवर सुमारे ६० हजार अतिरिक्त प्रवाशांची वाढ नोंदवण्यात आली. तसेच दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो-२ अ, अंधेरी पश्चिम ते मंडाले मेट्रो-२ ब, दहिसर ते गुंदवली मेट्रो-७ आणि दहिसर ते काशीगाव मेट्रो-९ या सर्व मार्गिकांवर प्रवाशांची गर्दी वाढली.

सायंकाळी ७ वाजेपर्यंतच मेट्रो-३ मार्गिकेवर ३० हजारांहून अधिक अतिरिक्त प्रवासी नोंदले गेले होते.

या घडामोडींमुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मेट्रोचे महत्त्व अधिक ठळकपणे अधोरेखित झाले असून, भविष्यात शहरातील वाहतुकीचा मोठा भार मेट्रो नेटवर्कवर अवलंबून राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!