राज्यातील निकृष्ट रक्तपेढ्यांवर एफडीएचा मोठा दणका;आतापर्यंत ३८ केंद्रांवर कारवाई, ४ परवाने कायमस्वरूपी रद्द

राज्यात सुरक्षित रक्तपुरवठ्यासाठी एफडीएची मोठी मोहीम; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रक्तपेढ्या आणि रक्त साठवणूक केंद्रांवर कठोर कारवाई, तुकाराम मुंढे यांचा स्पष्ट इशारा.

महाराष्ट्रातील रक्तपेढ्या आणि ब्लड स्टोरेज केंद्रांवर एफडीएची विशेष मोहीम. ३४ परवाने निलंबित, ४ कायमस्वरूपी रद्द; रुग्णांच्या सुरक्षिततेला प्राधान्य.

राज्यात नागरिकांना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि मानकांनुसार रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) रक्तपेढ्या आणि रक्त साठवणूक केंद्रांविरोधात कठोर मोहीम सुरू केली आहे. एप्रिल ते जून २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातील २३ रक्तकेंद्रे आणि १५ रक्त साठवणूक केंद्रांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३४ परवाने निलंबित करण्यात आले असून ४ परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.

सध्या महाराष्ट्रात ४१३ परवानाधारक रक्तकेंद्रे आणि ४६८ परवानाधारक रक्त साठवणूक केंद्रे कार्यरत आहेत. औषधे व प्रसाधने अधिनियम, १९४० तसेच संबंधित नियमांनुसार रक्त संकलन, तपासणी, रक्तघटकांचे विभाजन, साठवणूक, तापमान नियंत्रण, गुणवत्ता व्यवस्थापन, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनासाठी कठोर निकष निश्चित करण्यात आले आहेत. या नियमांचे पालन होत आहे की नाही, यासाठी एफडीएकडून नियमित तसेच आकस्मिक तपासण्या केल्या जातात.

एफडीएच्या अहवालानुसार, तपासणीत परवान्याच्या अटींचे उल्लंघन, गुणवत्ता व्यवस्थापनातील त्रुटी, अभिलेखांतील विसंगती, आवश्यक मानकांचे पालन न करणे आणि औषधे व प्रसाधने अधिनियमाचे उल्लंघन आढळल्याने संबंधित संस्थांवर कारवाई करण्यात आली.

कारवाई झालेल्या रक्तकेंद्रांमध्ये अमरावती, वाशीम, कल्याण, पुणे, सांगली, सातारा आणि शिरूर येथील रक्तपेढ्यांचा समावेश आहे. तसेच पुणे, ठाणे, अमरावती आणि बदलापूर येथील अनेक रक्त साठवणूक केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

याशिवाय, पुण्यातील पाटील हॉस्पिटल ब्लड स्टोरेज सेंटर आणि भिवंडीतील आधार ब्लड स्टोरेज सेंटर या दोन रक्त साठवणूक केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.

मुंबईतील दोन रक्तकेंद्रांवर कठोर कारवाई

जून २०२६ मध्ये प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे मुंबईतील दोन रक्तकेंद्रांची तपासणी करण्यात आली. तपासणीत गंभीर अनियमितता आढळल्याने माया ब्लड सेंटरचा परवाना रद्द करण्यात आला. रक्ताच्या सुरक्षिततेशी तडजोड होत असल्याचे स्पष्ट झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे एफडीएने सांगितले.

तसेच सर जे. जे. महानगर रक्तकेंद्रात परवान्याच्या अटी आणि लागू नियमांचे उल्लंघन आढळल्याने त्या रक्तकेंद्राचाही परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 ‘रुग्णांच्या जीवाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही’

एफडीएने स्पष्ट केले आहे की, रक्त आणि रक्तघटक हे कृत्रिमरित्या तयार करता येत नाहीत. त्यामुळे रक्तपुरवठा साखळीतील कोणतीही त्रुटी थेट रुग्णांच्या जीवावर बेतू शकते. थॅलेसेमिया, हिमोफिलिया, कर्करोग, अपघातग्रस्त आणि शस्त्रक्रिया रुग्णांसाठी सुरक्षित रक्त अत्यावश्यक असल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांविरोधात कठोर भूमिका कायम ठेवली जाणार आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, “रक्त हे सामान्य औषध नसून जीवनावश्यक घटक आहे. नागरिकांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण रक्त उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. नियमांचे उल्लंघन करून केवळ व्यावसायिक हितासाठी रक्तकेंद्रे चालविणाऱ्या संस्थांविरोधात सातत्याने कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. राज्यातील सर्व रक्तकेंद्रे आणि रक्त साठवणूक केंद्रांची नियमित तसेच अचानक तपासणी भविष्यात आणखी तीव्र करण्यात येईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!