जळगावातील लेकसाईड रेसिडेन्सी येथील घरफोडी प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक केली आहे.
जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा एमआयडीसी पोलिसांनी छडा लावत घरकाम करणाऱ्या महिलेसह तिच्या साथीदाराला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४ लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मेहरूण तलाव परिसरातील लेकसाईड रेसिडेन्सी, गणेश घाटाजवळ राहणाऱ्या सौ. सुषा प्रभुनाथ कावरा (वय ५१) यांच्या घरातून १२ जून रोजी सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तसेच शेजारी राहणाऱ्या तेजल पियुष संचेती यांच्या घरातूनही दागिन्यांची चोरी झाल्याचे समोर आले होते.
या प्रकरणात घरकाम करणाऱ्या समताबाई राजपाल घांडेकर (वय ३९, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव, मूळ रा. धारणी, जि. अमरावती) हिच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
तपासादरम्यान आरोपीने तिच्या साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी समताबाई घांडेकर हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्या माहितीवरून धर्मराज हरिसिंग मीना (वय २८, रा. पिपाराई, गंजबासोदा, जि. विदिशा, मध्य प्रदेश) यालाही अटक करण्यात आली.
पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून एकूण ४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये सोन्याचा नेकलेस आणि सोन्याचे दागिने यांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी यशस्वीपणे पूर्ण केली.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
