रेल्वे गेट उघडण्याच्या कारणावरून गेटमनला मारहाण; वाहनचालकाविरुद्ध कारवाईची मागणी

म्हसावद रेल्वे गेटवर ड्युटी बजावत असताना गेटमन प्रवीण महे यांच्यावर कथित मारहाण; घटनेनंतर रेल्वे कर्मचारी व नागरिकांकडून संबंधित वाहनचालकावर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी.

रेल्वे सुरक्षेचे कर्तव्य बजावत असलेल्या गेटमनवर हल्ल्याची धक्कादायक घटना. म्हसावद येथील प्रकरणामुळे रेल्वे कर्मचारी व नागरिकांमध्ये संताप.

 रेल्वे गेट बंद असताना ते तातडीने उघडण्याच्या मागणीवरून रेल्वे गेटमनला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १८) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास म्हसावद येथे घडली. या घटनेत रेल्वे कर्मचारी प्रवीण रामलाल महे (रा. म्हसावद, ता. जळगाव) हे जखमी झाले असून, झटापटीदरम्यान त्यांच्या अंगावरील शर्टही फाडण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे गेट नियमानुसार बंद असताना एका वाहनचालकाने ते त्वरित उघडण्याची मागणी केली. मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांनी नियमांचे पालन करत गेट उघडण्यास नकार दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला.

काही वेळातच हा वाद विकोपाला गेला. संतप्त झालेल्या संबंधित व्यक्तीने गेटमन प्रवीण महे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या झटापटीत त्यांच्या अंगावरील शर्ट फाडण्यात आला. या घटनेमुळे काही काळ रेल्वे गेट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

जखमी रेल्वे कर्मचाऱ्यावर उपचार करण्यात आले असून, घटनेची माहिती रेल्वे प्रशासन आणि पोलिसांना देण्यात आली आहे. पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, रेल्वे सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याबाबत रेल्वे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित वाहनचालकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!