एसटी प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा कास्ट्राईब संघटनेचा दावा; मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू, पुढील आंदोलनाचा इशारा.
एसटी महामंडळातील अधिकाऱ्याच्या कथित मनमानी कारभाराविरोधात कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे. जळगाव आगाराचे व्यवस्थापक संदीप पाटील हे कर्मचाऱ्यांशी भेदभावपूर्ण वर्तन करत असून, शिस्तभंग आणि विविध अर्जांबाबतच्या नियमांचा मनमानी पद्धतीने वापर करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या आरोपांच्या निषेधार्थ संघटनेने ६ ऑक्टोबरपासून साखळी उपोषण सुरू केले आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, संबंधित आगार व्यवस्थापकांना जळगाव विभागात तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्यांची तातडीने बदली करावी, तसेच त्यांच्या कारभाराची निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
प्रशासनाकडून कारवाई न झाल्याचा आरोप
या मागण्यांसाठी कास्ट्राईब संघटनेने यापूर्वी १७ ऑगस्ट रोजी आंदोलनाची नोटीस दिली होती. मात्र, त्यानंतरही एसटी प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचा दावा संघटनेने केला आहे.
यापूर्वी संघटनेने दोन वेळा उपोषण सुरू केले होते. प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनांनंतर हे उपोषण प्रत्येकी १५ दिवसांसाठी स्थगित करण्यात आले होते. मात्र, मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने आता पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.
मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण
साखळी उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची बदली आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास नाईलाजास्तव आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेने दिला आहे. त्यामुळे आता एसटी प्रशासन या आंदोलनावर काय भूमिका घेते, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
