वरणगाव महाविद्यालयात ‘नवे मतदार नोंदणी अभियान’ उत्साहात संपन्न ; युवा पिढीने लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन

वरणगाव येथील महाविद्यालयात मतदार नोंदणीबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन.

युवा पिढीने लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण होताच मतदार यादीत आपले नाव नोंदवणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. या उद्देशाने वरणगाव येथील स्थानिक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने ‘नवे मतदार नोंदणी अभियान’ उत्साहात राबविण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन इंगळे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली या अभियानाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. अशोकराव चित्ते होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी तरुणांनी केवळ मतदानाच्या अधिकाराविषयी चर्चा न करता प्रत्यक्ष मतदार यादीत आपले नाव नोंदवून लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले. “देशाचे भविष्य बदलण्याची ताकद युवा मतदारांमध्ये आहे,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रा. अजित कलवले यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी मतदार नोंदणीचे महत्त्व, मतदानाचा अधिकार तसेच संविधानाने नागरिकांना दिलेल्या मतदानाच्या हक्काविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या अभियानादरम्यान महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणीसाठी अर्ज भरून या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रजनी इंगळे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाचे विविध टप्पे नेटकेपणाने पार पाडले. कार्यक्रमाच्या समारोपावेळी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल जोहरे यांनी उपस्थितांचे तसेच अभियानासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवकांमध्ये मतदार नोंदणीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालयाने राबविलेल्या या उपक्रमाचे वरणगाव परिसरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!