२०० हून अधिक फार्मसी विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा सत्रात उत्स्फूर्त सहभाग घेतला. डिजिटल गोपनीयता, वैयक्तिक माहितीचे संरक्षण आणि सुरक्षित ऑनलाइन व्यवहाराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
लातूर कॉलेज ऑफ फार्मसी येथे २०० हून अधिक फार्मसी विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृतीपर विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, डिजिटल माध्यमांचा सुरक्षित वापर कसा करावा आणि ऑनलाइन व्यवहार करताना कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथील विद्यार्थी नम्रता तोर, नेहल बुलानी आणि साहिल जाधव यांनी विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती केली. त्यांनी ऑनलाइन फसवणूक, ओटीपी स्कॅम, फिशिंग लिंक, बनावट वेबसाइट्स, सोशल मीडिया अकाउंटची सुरक्षितता, मजबूत पासवर्ड, वैयक्तिक माहितीचे संरक्षण आणि डिजिटल गोपनीयता याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
सत्राचे विशेष आकर्षण म्हणजे लाईव्ह हॅकिंगचे प्रात्यक्षिक. प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून सायबर हल्ले कोणत्या प्रकारे होऊ शकतात आणि अशा परिस्थितीत डिजिटल डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारले.
आजच्या डिजिटल युगात शिक्षणासोबतच डिजिटल सुरक्षिततेचे ज्ञान प्रत्येक विद्यार्थ्याला असणे आवश्यक आहे. याच उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सत्रातून विद्यार्थ्यांमध्ये “सतर्क रहा, सुरक्षित रहा” हा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
