मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला जळगाव सायबर पोलिसांची अटक; लवकरच दाखल होणार दोषारोपपत्र

मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांनी आरोपीला इंदापूर येथून अटक केली. तपास अंतिम टप्प्यात असून लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार आहे.

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांची प्रभावी कारवाई. आरोपी अटकेत, फेसबुक खाते बंद; लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र.

 महाराष्ट्राचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि बदनामीकारक पोस्ट प्रसारित करणाऱ्या आरोपीला जळगाव सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अटक केली आहे. आरोपीविरुद्ध तपास अंतिम टप्प्यात असून, लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.

या प्रकरणी जळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक अरविंद भगवान देशमुख यांनी १९ जून २०२६ रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, “भारत बालाजी म्हस्के” या नावाने चालविण्यात येणाऱ्या फेसबुक खात्यावरून मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या कुटुंबीयांशी संबंधित फोटोचा वापर करून आक्षेपार्ह स्वरूपाची पोस्ट प्रसारित करण्यात आली होती.

तक्रारीची गंभीर दखल घेत सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३५६(३) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(क) आणि ६७ अन्वये गुन्हा दाखल केला.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर आणि सायबर पोलीस पथकाने तांत्रिक तपास, डिजिटल विश्लेषण तसेच इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला.

सुमारे महिनाभर चाललेल्या तपासानंतर आरोपी भरत बालाजी म्हस्के (वय ३४) याचा ठावठिकाणा पोलिसांना मिळाला. त्याला इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीने संबंधित पोस्ट केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेला सुमारे ३० हजार रुपये किमतीचा ओप्पो रेनो १५ फाइव्ह-जी मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.

दरम्यान, आरोपीने प्रसारित केलेली आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटविण्यात आली असून, सुमारे सहा हजार अनुयायी असलेले संबंधित फेसबुक खाते कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या कारवाईबद्दल जळगाव सायबर पोलिसांचे कौतुक होत असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्ह्यांचा प्रभावी तपास करण्याची पोलिसांची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून कोणाचीही बदनामी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!