लोकमान्य टिळक यांच्या स्वराज्य विचारांचे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक कार्याचे स्मरण करत संत मुक्ताबाई महाविद्यालयात विशेष कार्यक्रम संपन्न.
संत मुक्ताबाई महाविद्यालयात आज स्वातंत्र्यलढ्याचे महानायक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात दोन्ही महापुरुषांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेऊन त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय. डी. पाटील यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा आढावा घेताना सांगण्यात आले की, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील लाल-बाल-पाल या त्रयीतील ते एक प्रमुख नेते होते. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” ही त्यांची ऐतिहासिक गर्जना आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारी आहे. इंग्रजांविरोधात त्यांनी अनेक आंदोलने उभारली. समाजात राष्ट्रप्रेम आणि स्वातंत्र्याची भावना जागृत करण्यासाठी त्यांनी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वृत्तपत्रांद्वारे जनजागृती केली. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करून राष्ट्रीय एकात्मतेला नवी दिशा दिली. त्यांच्या कार्यामुळे त्यांच्यावर दोन वेळा राजद्रोहाचे आरोपही ठेवण्यात आले. स्वातंत्र्य आणि स्वराज्याच्या चळवळीत त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांना स्वातंत्र्य स्वराज्य क्रांतीचे प्रवर्तक म्हणून गौरविले जाते.
यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावरही प्रकाश टाकण्यात आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणापासून वंचित राहूनही त्यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि गीतांमधून कष्टकरी, कामगार, वंचित आणि उपेक्षित समाजाच्या वेदना प्रभावीपणे मांडल्या. त्यांनी आपल्या शाहिरीतून सामाजिक प्रबोधन आणि जनजागृतीचे कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियामध्ये सादर करणारे ते पहिले लोकशाहीर म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. त्यांच्या साहित्याने सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा दिली असून आजही त्यांचे कार्य समाजासाठी दिशादर्शक आहे.
या प्रसंगी दोन्ही महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या आदर्शांचे अनुसरण करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास डॉ. संदीप माळी, डॉ. रमेश शेवाळे, डॉ. के. पी. पाटील, डॉ. व्ही. एस. लव्हाळे, प्रा. शकुंतला गड्डम, प्रा. विनोद परिहार, प्रा. प्रकाश खिल्लारे, प्रा. विशाल धुंदे, प्रा. सौरव जोहरे, प्रा. अमर पाटील, प्रा. संदीप वानखेडे, प्रा. प्रशांत चौधरी, लीलाधर महाजन, अशोक पाटील, निलेश इंगळे, अमोल राजपूत, चंद्रकांत विसाळे, प्रदीप कोळी, प्रदीप पाटील आदी प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. प्रसन्न देशमुख यांनी केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

प्रा. डॉ. प्रसन्न देशमुख हे प्राध्यापक, संशोधक आणि लेखक असून त्यांना अध्यापन व संशोधन क्षेत्रातील १५ वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, पर्यावरणीय, कृषी आणि समकालीन विषयांवर ते संशोधनाधारित व विश्लेषणात्मक लेखन करतात. स्थानिक समाचार डिजिटल मीडियासाठी ते विविध सार्वजनिक महत्त्वाच्या विषयांवर अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित करून वाचकांना विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून देतात.
Mo. no. 7038224819, Email- psdeshmukh17@gmail.com
