अभ्युदयनगर, पीएमजीपी, मोतीलाल नगर, कामाठीपुरा आणि इतर प्रमुख म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासामुळे मुंबईतील घरांच्या उपलब्धतेत मोठी भर पडणार आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सुमारे ९९० एकर क्षेत्रावरील वसाहतींच्या समूह पुनर्विकासातून पुढील सात ते दहा वर्षांत सुमारे १ लाख ३० हजार घरांची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे म्हाडा वसाहतीतील ८२ हजार ५०० कुटुंबांचे पुनर्वसन होणार असून, अधिमूल्याच्या स्वरूपात म्हाडाला ९ हजार कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
राज्य शासनाने १५ डिसेंबर २०२५ रोजी २० एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या म्हाडा अभिन्यासांचा बांधकाम आणि विकास संस्थेमार्फत (कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी) समूह पुनर्विकास करण्याच्या धोरणाला मंजुरी दिली. त्यानंतर म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जायस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पांसाठी निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्यात आली.
पहिल्या टप्प्यात अभ्युदयनगर (काळाचौकी), पीएमजीपी (जोगेश्वरी पूर्व), मोतीलाल नगर (गोरेगाव पश्चिम), कामाठीपुरा आणि गुरु तेग बहादूर नगर या प्रकल्पांसाठी विकासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सरदार वल्लभभाई पटेल नगर (अंधेरी पश्चिम), आदर्श नगर (वरळी), वांद्रे रिक्लेमेशन आणि आराम नगर (वर्सोवा) या प्रकल्पांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. रामकृष्ण नगर (खार) आणि जुने एमएचबी (बोरिवली) हे प्रकल्प मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत.
या ११ प्रकल्पांतून म्हाडाला पुनर्वसनासाठी ५०० चौरस फुटांच्या १३ हजार सदनिका, तर विक्रीसाठी ७५० चौरस फुटांच्या ६५ हजार सदनिका मिळणार असून, एकूण १ लाख ८ हजार सदनिकांची निर्मिती होणार आहे.
पुढील टप्प्यात चारकोप (२४० एकर), गोराई (२५६ एकर) आणि प्रतीक्षा नगर, सायन (२९ एकर) या मोठ्या वसाहतींच्या समूह पुनर्विकासाचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार आहेत. हे प्रकल्प मंजूर झाल्यानंतर म्हाडाच्या एकूण ९९० एकर क्षेत्राचा समूह पुनर्विकास पूर्ण होईल.
या संपूर्ण पुनर्विकासातून ८२ हजार ५०० पुनर्वसन सदनिका, म्हाडासाठी २८ हजार विक्रीयोग्य सदनिका, तसेच सुमारे १ लाख ३० हजार घरे खुल्या बाजारात उपलब्ध होणार असून, मुंबईतील घरांच्या उपलब्धतेत मोठी भर पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अभ्युदय नगर (काळा चौकी) – ३७९९ (९७०), गुरु तेग बहादूर नगर (सायन ), १६८२ (५०३), पीएमजीपी, जोगेश्वरी – (८८१), मोतीलाल नगर, गोरेगाव पश्चिम – २४७६७ (७७७२), कामाठीपुरा – ६७९५ (९१६), सरदार वल्लभभाई पटेल नगर, अंधेरी पश्चिम – ९८४५ (१४६३), आदर्श नगर, वरळी – ३१०४ ( १५४८ कोटी), वांद्रे रिक्लेमेशन – ७१२४ (३९३० कोटी), आराम नगर, वर्सोवा – ४३५८ (२७०० कोटी), रामकृष्ण नगर, खार – ७८२ (१७६ सदनिका आणि ४२८ कोटी), जुने एमएचबी, बोरिवली – २८८० (४६०).

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
