ठाण्यात ‘ठाण्याचा राजा’ आणि ‘रामनगरचा राजा’सह गोविंदा पथकांनी नऊ थरांची सलामी दिली; मानवी मनोरे कोसळून १० गोविंदा जखमी.
लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या दहीहंडीमुळे ठाणे आणि घोडबंदर परिसरात शनिवारी उत्साहाला उधाण आले होते. विविध गोविंदा पथकांकडून उंचच उंच मानवी मनोरे रचण्याची चुरस पाहायला मिळाली. मात्र, या थराराला काही ठिकाणी अपघातांची किनार लागली. मानवी मनोरे रचताना थर कोसळल्याने झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण १० गोविंदा जखमी झाले. जखमी गोविंदांवर ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तसेच ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या काही वर्षांपासून ठाणे शहरात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्याशी संबंधित मंडळांकडून लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या दहीहंडीचे आयोजन केले जाते. ही बक्षिसे पटकावण्यासाठी मुंबईसह आसपासच्या शहरांमधून मोठ्या संख्येने गोविंदा पथके ठाण्यात दाखल होतात.
यंदाही ठाणे आणि परिसरात विविध गोविंदा पथकांमध्ये उंच थर रचण्याची चुरस पाहायला मिळाली. ‘ठाण्याचा राजा’ आणि ‘रामनगरचा राजा’ या ठाण्यातील दोन गोविंदा पथकांनी तब्बल नऊ थरांचा मानवी मनोरा रचला. मुंबईतील काही गोविंदा पथकांनीही नऊ थरांची सलामी देत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
थर कोसळल्याने १० गोविंदा जखमी
उंच मानवी मनोरे रचण्याच्या प्रयत्नात काही ठिकाणी गोविंदा घसरून किंवा थर कोसळून जखमी झाले. या विविध घटनांमध्ये १० गोविंदा जखमी झाले आहेत.
यापैकी चार जणांवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामध्ये जतिन पाटील (३०) यांना कमरेला व मानेला दुखापत झाली आहे. जतिन केशरी (३१) यांच्या कमरेला दुखापत झाली असून, नंदकिशोर शेलार (६५) यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. निखिल यादव (३५) यांच्या डाव्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.
याशिवाय हर्ष शर्मा (२१), गिरीश चिपकर (२३), आयुष गुप्ता (१९) आणि अमेय नाईक (२३) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अमन यादव (२१) यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून ओमकार शिंदे (२५) यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. या जखमी गोविंदांपैकी सहा जणांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
उंच थरांसोबत सुरक्षेचीही काळजी आवश्यक
दहीहंडीतील उंचच उंच मानवी मनोरे हा उत्सवाचा थरार वाढवतात. मात्र, या थरांमध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐरणीवर आला आहे. बक्षिसांच्या स्पर्धेत अधिकाधिक उंच थर रचण्याचा उत्साह असला, तरी गोविंदा पथकांनी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन, प्रशिक्षित गोविंदांचा सहभाग, आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर आणि योग्य खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
दहीहंडीचा उत्साह आणि परंपरा कायम ठेवतानाच गोविंदांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे या घटनांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
