शिक्षण, संशोधन, विद्यार्थी विकास आणि सामाजिक कार्यातील योगदानाची दखल; प्रा. डॉ. प्रशांत विघे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार प्रदान.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने प्रदान करण्यात येणारा ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ सन २०२४–२५ आणि २०२५–२६ या पुरस्कार वर्षांसाठी आज पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सन २०२५–२६ साठीचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार भारतीय महाविद्यालय, अमरावती येथील राज्यशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. प्रशांत विघे यांना प्रदान करून त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संशोधनात्मक कार्याचा गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री मा. श्री. चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते प्रा. डॉ. प्रशांत विघे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे राज्यमंत्री मा. ना. इंद्रनील नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, कला शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. प्रफुल्ल पवार आणि उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ. अर्चना बोराडे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. 
प्रा. डॉ. प्रशांत विघे हे भारतीय महाविद्यालय, अमरावती येथील राज्यशास्त्र विभागात कार्यरत असून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणूनही ते शैक्षणिक आणि विद्यापीठीय क्षेत्रात सक्रिय आहेत. अध्यापनासोबतच संशोधन, लेखन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम, तसेच संविधान, लोकशाही, निवडणूक प्रक्रिया आणि सामाजिक जाणीव निर्माण करणाऱ्या उपक्रमांमध्ये त्यांचे उल्लेखनीय योगदान राहिले आहे.
त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने राज्यातील आदर्श शिक्षक म्हणून त्यांची निवड केली. ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय सन्मान मिळाल्याने अमरावतीच्या शैक्षणिक क्षेत्रात विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिक्षक दिनानिमित्त पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऐतिहासिक सभागृहात महाराष्ट्र शासनाच्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सन्मानामुळे अमरावतीच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, प्रा. डॉ. प्रशांत विघे यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

प्रा. डॉ. प्रशांत विघे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील माहिती आणि लेख उपलब्ध करून देतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष लेखणीच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. आपल्या लेखणीच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी लेख प्रकाशित करतात.
मो. क्र. -९३२६८७७७४९
