खडूच्या हाताला हवा सभागृहात आवाज! अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६: आपल्यातलाच एक शिक्षक, आपल्या हक्कांचा प्रतिनिधी

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावी प्रतिनिधित्व मिळावे, या भूमिकेवर आधारित विशेष लेख.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ संदर्भात शिक्षकांचे प्रश्न आणि प्रा. डॉ. प्रशांत विघे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावरील विशेष लेख.

सकाळची प्रार्थना संपते, घंटा वाजते आणि हातात खडू घेऊन शिक्षक वर्गात प्रवेश करतो. समोर बसलेल्या निरागस डोळ्यांमध्ये तो उद्याचा भारत पाहतो. त्या क्षणी त्याच्या मनात ना रखडलेल्या पगाराची चिंता असते, ना पेन्शनच्या अनिश्चिततेचे सावट. असते ती फक्त एका पिढीला घडवण्याची तळमळ. पण तास संपल्यावर, घरी परतताना मात्र हेच प्रश्न त्याच्या खांद्यावर ओझे बनून बसतात. मान्यतेची फाईल कुठे अडली? थकबाकीचे देयक कधी निघणार? शिक्षण सेवक म्हणून किती वर्षे काढायची? आणि निवृत्तीनंतर आपल्या म्हातारपणाचा आधार कोण? वर्गात ज्ञानाचा दिवा लावणाऱ्या शिक्षकाच्या स्वतःच्या आयुष्यात मात्र अनेक प्रश्नांचा अंधार दाटलेला आहे.

घटनाकारांनी विधान परिषदेत शिक्षकांसाठी स्वतंत्र मतदारसंघ राखीव ठेवला, तो याच अंधाराला वाचा फोडण्यासाठी. त्यामागे एक विश्वास होता: शिक्षक हा सुज्ञ, विवेकी आणि अभ्यासू मतदार आहे. तो कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही आणि आपल्या प्रश्नांची खरी जाण असणाराच प्रतिनिधी निवडेल. पण मागील काही वर्षांचा आढावा घेतला, तर मनात एक अस्वस्थ प्रश्न उभा राहतो: आपण त्या विश्वासाला खरोखर पात्र ठरलो का? शिक्षकांसाठी राखीव असलेले हे व्यासपीठ राजकीय पुनर्वसनाचे साधन तर बनत नाही ना? आज आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे आणि त्याचबरोबर परिवर्तनाची संधीही.

ज्याच्या पायाला काटा, त्यालाच कळते वेदना

शिक्षकांचा प्रतिनिधी शिक्षकच असावा, ही केवळ घोषणा नाही, तर अनुभवातून आलेले सत्य आहे. ज्याने स्टाफरूममधील अस्वस्थ चर्चा ऐकल्या आहेत, ज्याने शिक्षण कार्यालयाच्या पायऱ्या झिजवणाऱ्या सहकाऱ्यांचे थकलेले चेहरे पाहिले आहेत, त्यालाच या वेदनेचा खरा अर्थ उमगतो. म्हणूनच या निवडणुकीत एक नाव विश्वासाने पुढे येते: प्रा. डॉ. प्रशांत विश्वेश्वर विघे.

भारतीय महाविद्यालय, अमरावती येथे राज्यशास्त्र विभागप्रमुख असलेले डॉ. विघे सर हे अध्यापनातील वीस वर्षांचा, संशोधनातील सतरा वर्षांचा आणि प्रशासनातील सहा वर्षांचा अनुभव असलेले व्यासंगी व्यक्तिमत्त्व आहे. एकेचाळीस पुस्तके, पंच्याऐंशी शोधनिबंध आणि दोनशेहून अधिक लेख, एवढी समृद्ध लेखनसंपदा असणारा हा माणूस केवळ ग्रंथांमध्ये रमणारा अभ्यासक नाही. पुस्तकांतील विचार रस्त्यावरच्या संघर्षात उतरवणारा तो एक कृतिशील कार्यकर्ता आहे.

आश्वासनांचा नव्हे, कामाचा हिशोब

निवडणूक आली की आश्वासनांचा पाऊस पडतो. पण मतदार म्हणून आपण विचारायला हवे: काल काय केले? डॉ. विघे सरांकडे या प्रश्नाचे उत्तर आकडेवारीसह आहे. संत गाडगेबाबा यांनी अमरावती विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी असताना, २०१४ ते २०२२ या काळात शिक्षकांची ४९,००० हून अधिक प्रलंबित देयक प्रकरणे त्यांनी पाठपुरावा करून मार्गी लावली आणि सुमारे तीन कोटी एकवीस लाख रुपये शिक्षकांच्या हाती पोहोचले. २०२२ पासून थांबलेली संशोधन केंद्रांची मान्यता पुन्हा सुरू करून १८५ महाविद्यालयांतील २०२ संशोधन केंद्रांना मान्यता मिळवून दिली. DCPS मधून NPS मध्ये हस्तांतरणाची रखडलेली प्रक्रिया मार्गी लावत १,१८० प्राध्यापक आणि ९१० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ताळेबंद नियमित करून घेतले.

सेट-नेट अटीमुळे अडचणीत आलेल्या एम.फिल. पदवीधारक शिक्षकांच्या प्रश्नावर त्यांनी शासनदरबारी लढा दिला; विद्यापीठातील १३८ शिक्षकांच्या सेवा नियमित झाल्या. नव्या परिपत्रकामुळे ५६ संशोधक विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले, तेव्हा आंदोलनात्मक भूमिका घेऊन त्यांनी त्यांना न्याय मिळवून दिला. ग्रंथपालांना शिक्षक संवर्गाचा सन्मान मिळावा म्हणूनही त्यांनी राज्यस्तरावर पाठपुरावा केला. आणि हे सर्व करताना कोणताही आर्थिक व्यवहार नाही, हे त्यांच्या कार्याचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे.

जुन्या पेन्शनसाठी उपाशीपोटी लढणारा प्राध्यापक

भाषणे देणे सोपे असते; पण स्वतःच्या शरीराला वेदना देऊन लढणे हे निष्ठेचे लक्षण असते. २ ते ७ ऑक्टोबर २०२४ दरम्यान वर्धा येथे जुन्या पेन्शन योजनेसाठी झालेल्या आमरण उपोषणात, सलग पाच दिवस उपोषण करणारे ते एकमेव प्राध्यापक होते. ज्या शिक्षकाने आयुष्यभर पिढ्या घडवल्या, त्याचे म्हातारपण असुरक्षित राहू नये, यासाठी उपाशीपोटी बसलेला हा माणूस आपल्या प्रश्नांसाठी विधिमंडळात किती तळमळीने बोलेल, याचा अंदाज आपण सहज बांधू शकतो.

त्यांच्या या प्रामाणिक कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ देऊन घेतली आहे, तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ‘उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार’ देऊन त्यांचा सन्मान केला आहे. शासन आणि विद्यापीठ या दोन्ही स्तरांवर उमटलेली ही विश्वासाची मोहोर आहे.

प्रत्येक स्तरावरच्या शिक्षकासाठी जाहीरनामा

डॉ. विघे सरांचा जाहीरनामा हा केवळ आश्वासनांचा दस्तऐवज नसून कृतीचा आराखडा आहे. माध्यमिक शाळेतील शिक्षकासाठी तो टप्पा अनुदानित शाळांना तात्काळ शंभर टक्के अनुदान, शिक्षण सेवक योजना रद्द करून पहिल्या दिवसापासून नियमित दर्जा आणि अशैक्षणिक कामांपासून मुक्तीची हमी मागतो. कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकासाठी तो रिक्त पदांची शंभर टक्के भरती आणि संचमान्यतेचे न्याय्य धोरण मांडतो. वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकासाठी तो CAS अंतर्गत प्रलंबित स्थाननिश्चिती, आठव्या वेतन आयोगाची वेळेत अंमलबजावणी आणि संचालक स्तरावर प्रस्तावांचा कालबद्ध निपटारा यांचा आग्रह धरतो. आणि या सर्वांना जोडणारा धागा आहे: २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्वांसाठी जुनी पेन्शन योजना.

कोणतीही फाईल पंधरा दिवसांपेक्षा अधिक प्रलंबित राहू नये, दर महिन्याला ‘जनता दरबार’ भरवून तक्रारींची प्रत्यक्ष सुनावणी व्हावी आणि प्रत्येक प्रकरणाची सद्यस्थिती ऑनलाइन पाहता यावी, हे मुद्दे वाचताना जाणवते की हा जाहीरनामा कार्यालयाबाहेर तासन्‌तास ताटकळलेल्या शिक्षकाच्या अनुभवातून जन्माला आला आहे.

आता जबाबदारी आपली

शिक्षक बंधू-भगिनींनो, आपण रोज विद्यार्थ्यांना योग्य आणि अयोग्य यांतील फरक शिकवतो. आज तीच कसोटी आपल्या स्वतःच्या निर्णयावर आहे. आपले एक मत म्हणजे केवळ एका उमेदवाराचा विजय नव्हे, तर पुढील सहा वर्षांच्या आपल्या सन्मानाचा, सुरक्षिततेचा आणि शिक्षण व्यवस्थेच्या दिशेचा निर्णय आहे.

म्हणूनच केवळ स्वतः मतदान करून थांबू नका. आपल्या शाळेतील, महाविद्यालयातील प्रत्येक पात्र सहकाऱ्यापर्यंत हा विचार पोहोचवा. स्टाफरूममधील चहाच्या कपासोबत होणाऱ्या चर्चेत हा प्रश्न उपस्थित करा: आपला प्रतिनिधी कोण असावा? एकही शिक्षक मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्या. हा लढा एका व्यक्तीचा नाही; तो प्रत्येक शिक्षकाच्या आत्मसन्मानाचा आहे.

ज्या हातांनी पिढ्या घडवल्या, त्याच हातांनी आता आपला प्रतिनिधी घडवायचा आहे. चला, खडूच्या हाताला सभागृहात आवाज देऊया. आपल्यातल्याच एका प्रामाणिक शिक्षकाला, प्रा. डॉ. प्रशांत विघे यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करूया!

— प्रा. अंकुश कडू

८६६८२१९०४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!