राष्ट्रसंतांचे विचार कृतीत आणा : डॉ. सतीश तराळ ;तिवसा येथे प्रचारभिष्म शामरावदादा मोकदम स्मृती ग्रामगीता व्याख्यानमाला संपन्न

तिवसा येथे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने आयोजित प्रचारभिष्म शामरावदादा मोकदम स्मृती ग्रामगीता व्याख्यानमालेत डॉ. सतीश तराळ यांनी ‘ग्रामगीतेतील लोकवशीकरण पंचकातील आचारप्राबल्य’ या विषयावर मार्गदर्शन केले.

अमरावती विद्यापीठाच्या जनसंपर्क विभाग आणि तिवसा येथील वाय.डी.व्ही.डी. महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ग्रामगीता व्याख्यानमाला आयोजित; विद्यार्थ्यांना संतांच्या विचारांचे मार्गदर्शन.

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून केवळ विचार मांडले नाहीत, तर समाजातील व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, अज्ञान आणि दारिद्र्य प्रत्यक्ष अनुभवून त्यावर उपाय सांगितले. त्यामुळे ग्रामगीतेतील विचार केवळ वाचण्यापुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष कृतीत आणणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अमरावतीचे साहित्यिक व वक्ते डॉ. सतीश तराळ यांनी केले.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या जनसंपर्क विभाग आणि वाय. डी. व्ही. डी. कला व वाणिज्य महाविद्यालय, तिवसा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रचारभिष्म शामरावदादा मोकदम जन्मशताब्दी केंद्रीय समिती, अमरावती यांच्याकडून प्राप्त दाननिधीतून ‘प्रचारभिष्म शामरावदादा मोकदम स्मृती ग्रामगीता व्याख्यानमाला’ आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेत ‘ग्रामगीतेतील लोकवशीकरण पंचकातील आचारप्राबल्य’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. तराळ बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे होते. यावेळी प्रचारभिष्म शामरावदादा मोकदम जन्मशताब्दी केंद्रीय समिती तथा वनराईचे अमरावती अध्यक्ष मधुभाऊ घारड, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे आचार्य हरिभाऊ विरुळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. आर. देशमुख, विद्यापीठाच्या संत गाडगे बाबा अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. दिलीप काळे आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर उपस्थित होते.

आत्मशुद्धी आणि चारित्र्याला महत्त्व

विषयाची मांडणी करताना डॉ. सतीश तराळ यांनी चारित्र्य आणि आत्मशुद्धीचे महत्त्व अधोरेखित केले. लोकांना तत्वज्ञान सांगणे आणि प्रबोधन करणे सोपे असले, तरी त्याप्रमाणे स्वतःचे जीवन जगणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.

आजची सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी आत्मशुद्धी हा महत्त्वाचा मार्ग आहे. ज्या व्यक्तींची आत्मशुद्धी झालेली आहे आणि ज्यांचे चारित्र्य शुद्ध आहे, त्यांच्या विचारांना समाज स्वीकारतो. त्यामुळे इतरांना उपदेश करण्यापूर्वी प्रत्येकाने स्वतःची जीवनचर्या, साधना आणि आचरण तपासून पाहिले पाहिजे, असे डॉ. तराळ यांनी स्पष्ट केले.

केवळ व्यसनमुक्ती किंवा समाजसुधारणेचा उपदेश करून उपयोग नाही, तर स्वतःच्या आचरणातून त्याचा आदर्श निर्माण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

समाजसुधारकांनी कृतीतून दिला आदर्श

स्वतःचे चारित्र्य आणि पात्रता निर्माण करण्यासाठी सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गोविंद प्रभू, महात्मा गांधी, शामरावदादा मोकदम, महात्मा फुले आणि नरेंद्र दाभोळकर यांसारख्या समाजसुधारकांनी केवळ उपदेश केला नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून समाजासमोर आदर्श निर्माण केला, असे डॉ. तराळ यांनी सांगितले.

संत गाडगे बाबांनी समाजात राहून भटकंती आणि साधना केली. समाजाची नाळ ओळखून त्यांनी दशसूत्रीच्या माध्यमातून समाजाला मार्गदर्शन केले. महात्मा गांधी यांनी देशभर भ्रमण करून समाजाच्या समस्या जाणून घेतल्या आणि स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक परिवर्तनाचा आदर्श घालून दिला, असे त्यांनी नमूद केले.

शामरावदादांचे कार्य अधोरेखित

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शामरावदादा मोकदम यांनी आरती मंडळ स्थापन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. स्वातंत्र्यलढ्यात लोकांमध्ये राष्ट्रभक्ती आणि बलिदानाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी गावोगावी जाऊन प्रचार केला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे संपूर्ण जीवन कृती, आचारधर्म आणि समाजप्रबोधनावर आधारित होते. ग्रामगीतेच्या माध्यमातून त्यांनी केवळ गावाच्या विकासाचा विचार मांडला नाही, तर गावाला विश्वाच्या नकाशाचे केंद्र मानून संपूर्ण जगाच्या परिवर्तनाची व्यापक दृष्टी मांडली. त्यांची देव आणि धर्माची संकल्पना मानवतावादी होती. त्यांचे जीवन हे कर्मयज्ञ, कृतीयज्ञ आणि आचारधर्माचे मूर्तिमंत उदाहरण होते, असे डॉ. तराळ यांनी सांगितले.

यावेळी मधुभाऊ घारड आणि आचार्य हरिभाऊ विरुळकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

विद्यार्थ्यांपर्यंत संतांचे विचार पोहोचविण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न

अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये चारित्र्य, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रनिर्मितीची भावना निर्माण करण्यासाठी संतांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगितले.

विद्यापीठाचा विद्यार्थी चारित्र्यसंपन्न घडावा आणि देशाच्या विकासात त्याचे योगदान राहावे, या उद्देशाने अभ्यासासोबतच संतांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने अशा व्याख्यानमालांचे आयोजन केले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. सतीश तराळ यांनी ग्रामगीतेतील लोकवशीकरण पंचकातील आचारप्राबल्य हा विषय विद्यार्थ्यांसमोर सोप्या भाषेत मांडला. संतांनी केवळ विचार दिले नाहीत, तर स्वतः कृती करून त्या विचारांचा आदर्श समाजासमोर ठेवला. विद्यार्थ्यांनीही प्रत्यक्ष कृतीवर भर देऊन आपले जीवन अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करावा, असे डॉ. ढोरे यांनी सांगितले.

पुस्तकाचे प्रकाशन

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगे बाबा, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शामरावदादा मोकदम आणि यादवराव देशमुख यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पार्पण करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर विद्यापीठ गीत आणि संस्थागीत सादर करण्यात आले.

यावेळी शामराव मोकदम यांच्या कार्यावरील पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. डॉ. सतीश तराळ यांनी त्यांनी लिहिलेली पुस्तके महाविद्यालयाला भेट दिली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत देशमुख यांनी स्वागत केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विनोद खडसे यांनी सूत्रसंचालन केले, तर ग्रंथपाल प्रा. रविंद्र पाटील यांनी आभार मानले.

व्याख्यानमालेस महाविद्यालयातील प्राध्यापक, राष्ट्रसंतांचे भक्त, मोकदम कुटुंबातील सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!