४२ पुस्तके, शेकडो शोध निबंध आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारे प्रा. डॉ. प्रशांत विघे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार. जाणून घ्या त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी प्रवास.
आज अचानक एक गोड बातमी कानावर आली की, ज्या व्यक्तीला मी सत्यशोधक शिक्षक मानतो, दस्तूरखुद्द त्यालाच राज्य शासनाने विद्यापीठ संवर्गातून वर्ष २०२५-२६ चा डॉ. जे. पी. नाईक आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार देऊन सन्मानीत केले आहे. प्रत्यक्ष पुरस्कार प्रदान करणे वगैरेची औपचारिकता, शिक्षक दिनाच्या पर्वावर दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी पुण्याला शासनाच्या शिरस्त्याप्रमाणे केल्या जाणार. एवढे मात्र निश्चीत, या बातमीने बऱ्याच दिवसानंतर दिवसेंदिवस अवनत होत चाललेल्या शासन व्यवस्थेवर काहीसा विश्वास टाकावासा वाटला.
या शिक्षकाचा जन्म मोर्शी तालुक्यातील ग्राम दापोरी येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. बालपण गाव खेडयात गेले असल्याने त्याच्या व्यक्तिमत्वाला गावकीच्या जिव्हाळ्याने ल्यायलेला एक मोहक गंध आहे. मनातून अत्यंत हळवा असला तरी वेळप्रसंगी तो तेवढाच जिगरबाज! जेव्हा कुणाचा गैरव्यवहार, भ्रष्ट आचार त्याच्या निदर्शनात येतो, तेव्हा तो अतीशय कठोर होतो. समज देऊन सुद्धा व्यक्ती गैरवर्तणूक सुधारत नसेल, तर त्याची तो खैर करीत नाही. या वेगळ्या गुणवैशिष्ठ्याने प्रथमदर्शनी तो काहीसा सैनिकी शिस्तीचा गडी भासतो. स्वच्छ चारित्र्य, परोपकारी वृत्ती, समर्पण, जिद्द, चिकाटी त्याची बलस्थाने आहेत. मुळात ज्ञानार्जनाची आंतरिक ओढ असल्याने अनेक आव्हानांना सामोरे जात त्याने उच्च शिक्षणाचे शिखर पादाक्रांत केले आणि एक दिवस तो अध्यापन सेवेत रुजू झाला. विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी, संशोधक दृष्टी, प्रभावी वक्तृत्वशैली, आश्वासक देहबोली, आणि सृजनशीलता यातून त्याचे अध्यापन उत्तरोत्तर समृद्ध होत गेले. त्यामुळे अल्पावधीतच तो एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ख्यातकीर्त झाला. असा हा सत्यशोधक आदर्श शिक्षक म्हणजे भारतीय महाविद्यालय, अमरावती येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रशांत विश्वेश्वर विघे!
अध्यापनासोबत डॉ. प्रशांत विघे यांनी विपूल लेखन केले आहे. त्यांची ४२ पुस्तके, शेकडो शोध निबंध प्रकाशित झाले असून, नियमित स्तंभ लेखन हा त्यांच्या सृजनाचा विलक्षण पैलू आहे. त्यांची पुस्तके आठ विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ म्हणून समाविष्ट करण्यात आली आहेत. राज्य व राष्ट्रीय लोक सेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत सुद्धा त्यांची ग्रंथ संपदा परीक्षार्थीना अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
संपूर्ण विदर्भ, कार्यक्षेत्र असलेल्या नुटा संघटनेत कार्य करताना डॉ. प्रशांत विघे यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्कृष्ट संसदपटू आमदार प्रा. बी. टी. देशमुख यांच्या प्रभावशाली व्यक्तिमत्वाने संमोहीत केले. देशमुख सरांची कर्तव्यनिष्ठा व समाजभान यातून डॉ. विघे यांना प्रेरणेचा अखंड स्रोत मिळाला. प्रा. बी. टी. देशमुख सरांच्या सानिध्यात डॉ. प्रशांत विघे यांच्या व्यक्तिमत्वात निहित नेतृत्वगुण उदयीमान होऊ लागले. त्यांचे संघटन कौशल्य अधिक प्रभावी झाले. परिणामी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट मेंबर म्हणून ते निवडून आले.
केवळ निवडणूक जिंकणे हे डॉ. विघे यांचे ध्येय कधीच नव्हते. सिनेट सदस्य म्हणून विद्यापीठ प्रशासनातील त्रुटींचा त्यांनी अभ्यास केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या मूल्यांकन केंद्रात शिक्षकांच्या देयकांच्या संदर्भात ४९ हजार प्रकरणे प्रलंबीत आहेत. या सर्व प्रकरणांचा अडीच वर्षात त्यांनी एकहाती निपटारा केला. त्याचप्रमाणे एम. फील. पदवीधारक शिक्षकांवर यूजीसीने अचानक सेट, नेट अर्हता प्राप्त करण्याची अट लादली, त्यामुळे या शिक्षकांच्या सेवा मागील तीन दशकांपासून नियमीत होत नव्हत्या. अशा १४२१ सेट, नेट ग्रस्त शिक्षकांच्या सेवा नियमीत करण्यासाठी डॉ. प्रशांत विघे यांनी जीवाचे रान केले. शिक्षकांच्या कामासाठी सतत स्वखर्चाने दिल्ली, मुंबई, पुणे कार्यालयात कित्येक वाऱ्या केल्या आणि अखेर या सर्व शिक्षकांना न्याय मिळवून देण्यात यशस्वी झाले.
दरम्यान, शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करायची नाही, असा तुघलकी निर्णय घेतला. याच्या विरोधात डॉ. प्रशांत विघे यांनी सेवाग्राम (वर्धा) येथे सहा दिवस आमरण उपोषण केले. शासन आज यावर सकारात्मक विचार करीत असल्याचे समजते.
डॉ. प्रशांत विघे यांच्या जीवनात एक दुःखद वळण आले. त्यांचे मूळ गाव दापोरी येथून कुटुंबासहीत अमरावतीला येत असताना त्यांच्या वाहनाला मोठा अपघात झाला. सर्वांना गंभीर दुखापत झाली. या मध्ये त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. या दुःखद प्रसंगातून सावरायला सर्वांचा बराच काळ गेला.
तब्बेत बरी झाल्यावर महाविद्यालयात डॉ. विघे यांनी पुन्हा आपले अध्यापन कार्य सुरू केले. एक दिवस अपघातात जखमी झालेल्यांच्या उपचारावर झालेल्या खर्चाचा प्रस्ताव घेऊन सहसंचालक उच्च शिक्षण यांच्या कार्यालयात गेले. तेव्हा सहसंचालकांनी त्यांना लाच मागितली. डॉ. विघे यांनी त्यांना असा गैरव्यवहार बरा नाही, असे वारंवार समजाविले. परंतु त्यांनी पैशाची मागणी सोडली नाही. शेवटी डॉ. विघे यांनी सक्त पाऊल उचलले आणि सहसंचालकाला भ्रष्टाचार विरोधी कायद्या अंतर्गत तुरुंगात पाठविले आणि शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी चव्हाट्यावर आणली.
अधिक खोलवर जाऊन राज्यातील शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास केला असता त्यांच्या लक्षात आले की, मागील काही दशकात राज्यातील शिक्षण व्यवस्था भ्रष्टाचारात आकंठ बुडत चालली आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, शिक्षण उपसंचालक, उच्च व तंत्रशिक्षण सहसंचालक, संचालक, संस्थाचालक सर्वच कसे भांडवलदार झाले आहेत. सर्वजण विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण करीत आहे. या भ्रष्ट व्यवस्थेवर राजकीय वरदहस्त असल्याशिवाय कुठलाही अधिकारी इतक्या राजरोसपणे आपल्या अधिकाराचा गैरवापर करूच शकत नाही, हे त्यांनी जाणले.
या भ्रष्ट व्यवस्थेवर अंकुश लावण्यासाठी विधान भवनात आपला मुखर प्रतिनिधी असणे गरजेचे आहे, असे त्यांचे पक्के मत झाले. त्यामुळे आगामी नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत “शिक्षकांचा प्रतिनिधी शिक्षकच असावा” असे ब्रीदवाक्य घेऊन त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे.
डॉ. प्रशांत विघे यांच्या शैक्षिणक, संशोधन, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रात केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल शासनाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवांन्वित केले. खरे तर ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात निहित सत्यशोधक शिक्षकाची पावती होय. डॉ. प्रशांत विघे आम्हास आपला सार्थ अभिमान आहे. आपले त्रिवार अभिनंदन व पुढील देदीप्यमान वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
प्राचार्य डॉ. पी. आर. राजपूत, अमरावती
९३७३०२३६४४

प्रा. डॉ. प्रशांत विघे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील माहिती आणि लेख उपलब्ध करून देतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष लेखणीच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. आपल्या लेखणीच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी लेख प्रकाशित करतात.
मो. क्र. -९३२६८७७७४९
