हवामान विभागाच्या अंदाजानुसार २०२६ चा मान्सून आव्हानात्मक ठरण्याची शक्यता. IOD, एल निनो आणि खरीप नियोजन समजावून सांगणारा मार्गदर्शक लेख.
✍️: – पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ
या आठवड्यात विविध शेतात पक्षी निरीक्षणाला गेल्यावर शेतकऱ्यांशी या वर्षीचा खरीप हंगाम आणि पावसाचे संकट यावर चर्चा झाली.भारतीय हवामान विभाग (IMD) आणि जागतिक हवामान संघटनेने (WMO) यंदा भारतात तीन महिने दुष्काळसदृश स्थिती, पूर आणि उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागेल, असा इशारा दिला आहे.या इशाऱ्यांचा भारतीय शेतकऱ्यांनी गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे; कारण आपली जवळपास ८०% शेती कोरडवाहू असून ती पूर्णपणे मान्सूनवर अवलंबून आहे. तसेच देशातील ४५% रोजगार अजूनही शेती क्षेत्राशी जोडलेला असल्याने, भारतीय शेतीचे संपूर्ण अर्थकारण नैऋत्य मान्सूनवरच उभे आहे. हवामान विभागाने यंदाच्या २०२६ च्या खरीप हंगामासाठी देशात अवघा ९०% पाऊस पडेल, असा सुधारित अंदाज दिला असून हा अंदाज ‘सामान्यपेक्षा कमी’ या श्रेणीत मोडतो. या अंदाजामागे प्रशांत महासागरात निर्माण झालेला तीव्र ‘एल निनो’ (El Niño) कारणीभूत असल्याचे आपण सातत्याने ऐकत आहोत. पण यंदाच्या खरिपाचे गणित बिघडवण्यामागे हिंदी महासागरातील एक अतिशय सूक्ष्म, पण तितकाच महत्त्वाचा पडद्यामागील घटक काम करतोय; तो म्हणजे ‘तटस्थ’ (Neutral) स्थितीमध्ये असलेला ‘इंडियन ओशन डायपोल’ (IOD). हवामान खात्याची ही तांत्रिक भाषा आणि महासागरातील या घडामोडी थेट आपल्या मातीशी, शेतातील बियाणांशी आणि शेतकऱ्यांच्या खिशाशी जोडलेल्या आहेत. म्हणूनच, प्रत्येक शेतकरी बांधवाने या गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेणे यंदा अत्यंत गरजेचे आहे.
शेतकऱ्यांनी सर्वात आधी ‘इंडियन ओशन डायपोल’ (IOD) म्हणजे काय? हे सोप्या भाषेत समजून घेतले पाहिजे. आयओडी म्हणजे आपल्या शेजारी असलेल्या हिंदी महासागराचा अंतर्गत हवामान पॅटर्न आहे, या हवामान पॅटर्न चा अर्थ आहे समुद्राच्या पाण्याचे तापमान कमी-जास्त होणे होय. याला अनेकदा भारतीय मान्सूनचा ‘रिमोट कंट्रोल’ किंवा नियंत्रक मानले जाते. जेव्हा हा आयओडी ‘पॉझिटिव्ह’ (सकारात्मक) असतो, तेव्हा आफ्रिकेकडचा समुद्र भारताच्या जवळील समुद्रापेक्षा जास्त गरम होतो आणि यामुळे अरबी समुद्रात प्रचंड मोठ्या प्रमाणावर बाष्प तयार होऊन भारतात चांगला पाऊस पडतो. हा पॉझिटिव्ह आयओडी भारतीय शेतीसाठी ‘वरदान’ ठरतो, कारण तो प्रशांत महासागरातील ‘एल निनो’सारख्या दुष्काळी राक्षसाच्या प्रभावाला थेट रोखून धरतो. याउलट, जेव्हा आयओडी ‘नेगेटिव्ह’ (नकारात्मक) असतो, तेव्हा पावसाचे प्रमाण कमालीचे घटते आणि एल निनो अधिक सक्रिय होतो. यंदा हवामान खात्याने धोक्याची जी घंटा वाजवली आहे, ती म्हणजे मान्सूनच्या सुरुवातीला, म्हणजेच जून आणि जुलै महिन्यांत हा इंडियन ओशन डायपोल ‘तटस्थ’ राहणार आहे. समुद्राचे तापमान तटस्थ असणे म्हणजे त्यात कोणताही विशेष बदल न होणे होय. शेतकऱ्यांच्या व्यावहारिक भाषेत सांगायचे तर, यंदा प्रशांत महासागरात ९२% तीव्रतेने सक्रिय असलेला ‘एल निनो’ भारताचा पाऊस स्वतःकडे ओढून नेईल, तेव्हा त्याला रोखण्यासाठी आपल्या हिंदी महासागराकडे ‘पॉझिटिव्ह आयओडी’ची ढाल नसेल. मान्सूनच्या सुरुवातीलाच आयओडी तटस्थ राहिल्यामुळे एल निनोला मोकळे रान मिळणार असून परिणामी जून आणि जुलै महिन्यात पाऊस कमालीचा घटू शकतो, तसेच खरिपाच्या ऐन मोसमात पावसाचा प्रदीर्घ खंड पडण्याची दाट शक्यता आहे.
या महासागरीय घडामोडींचा फटका शेतकऱ्यांना प्रामुख्याने दोन प्रकारे बसेल. पहिला परिणाम म्हणजे, जरी मान्सून केरळमध्ये वेळेवर दाखल झाला, तरी अरबी समुद्रातील पावसाचे ढग पुढे खेचून आणणारी मुख्य शक्ती म्हणजेच आयओडी तटस्थ असल्यामुळे मान्सूनचा पुढील प्रवास मंदावेल. यामुळे आपल्या खानदेशात आणि मध्य महाराष्ट्रामध्ये अधिकृत मान्सून पोहोचायला जूनचा दुसरा किंवा तिसरा आठवडा उजाडू शकतो. दुसरा आणि सर्वात मोठा धोका म्हणजे दुबार पेरणीचे मोठे संकट होय. जूनच्या सुरुवातीला स्थानिक पातळीवर विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व किंवा वादळी पाऊस नक्कीच होईल. हा पाऊस पाहून जर शेतकऱ्यांनी घाईघाईने कापूस, सोयाबीन किंवा मक्याची पेरणी उरकली, आणि त्यानंतर एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस अचानक गायब झाला, तर जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने महागडे बियाणे जमिनीतच जळून खाक होईल. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे आर्थिक संकट कोसळण्याची तीव्र भीती निर्माण झाली आहे.
यंदाच्या मान्सूनची ही महासागरीय गुंतागुंत केवळ वरवरच्या अंदाजांवर आधारित नाही, तर ती उपग्रहीय डेटा आणि सखोल संशोधनावर आधारित आहे. या घडामोडींबद्दल अधिक सविस्तर, अधिकृत आणि शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी प्रत्येक जागरूक शेतकऱ्याने पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे (Ministry of Earth Sciences) सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी जारी केलेला हवामान विभागाचा अधिकृत व्हिडिओ आवर्जून पाहिला पाहिजे. आयएमडीच्या विविध व्हिडिओंमध्ये आयओडी तटस्थ असण्याचा भारतावरील परिणाम, मान्सूनच्या उत्तरार्धात तो किंचित पॉझिटिव्ह होण्याच्या अंधुक शक्यता आणि एल निनोचा प्रत्यक्ष प्रभाव यावर अतिशय सोप्या भाषेत माहिती दिली आहे. हा अधिकृत व्हिडिओ पाहिल्यास शेतकऱ्यांना कोणत्याही अफवांवर किंवा स्थानिक हवामानाच्या अंदाजांवर विसंबून न राहता, स्वतःच्या शेतीचे शास्त्रोक्त पद्धतीने नियोजन करणे सोपे जाईल.
या सर्व पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी आता पुढाकार घेऊन शेतकऱ्यांमध्ये ‘हरित वैज्ञानिक दृष्टिकोन’ (Green Scientific Temperament) रुजवण्याची अत्यंत गरज आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारल्यामुळेच लहरी मान्सूनचा सामना करणे शेतकऱ्यांना शक्य होईल. यावर्षी जोपर्यंत आपल्या शेतात किमान ३ ते ४ इंच (७५ ते १०० मिलिमीटर) सलग आणि मुसळधार पाऊस होत नाही आणि जमिनीतील उष्णता पूर्णपणे शांत होऊन मातीत खोलवर ओलावा तयार होत नाही, तोपर्यंत पेरणीची अजिबात घाई करू नका. यंदा एकूण पाऊस कमी आणि प्रदीर्घ खंडाचा राहणार असल्याने जास्त पाण्याची पिके टाळून कमी पाण्यात आणि कमी कालावधीत येणाऱ्या पिकांची किंवा वाणांची निवड करणे फायदेशीर ठरेल. तसेच शेतातील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आच्छादनाचा (Mulching) जास्तीत जास्त वापर करावा आणि विहिरी किंवा कूपनलिकांच्या पाण्याचा अपव्यय टाळून आत्तापासूनच पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे. २०२६ चा हा मान्सून आपल्या संयमाची आणि विज्ञानाची परीक्षा पाहणारा आहे; म्हणूनच हवामान खात्याचे अधिकृत व्हिडिओ आणि अहवाल पाहून जर आपण पावले टाकली, तर संभाव्य मोठे आर्थिक नुकसान निश्चितपणे टाळू शकू.

राजेंद्र गाडगीळ हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक,शैक्षणिक, पर्यावरण आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष लेखनाच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी लेख प्रकाशित करतात.
मो. 8999809416, email- gadgilrd@gmail.com
