पर्यावरण दिनी जखमी घोणस सापाचे प्राण वाचवणाऱ्या सर्पमित्र राजेश सोनवणे, तुषार करोसिया आणि डॉ. सुरज बोराखेडे यांच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सर्पमित्र राजेश सोनवणे यांनी अतिविषारी घोणस (Russell’s Viper) जातीच्या जखमी सापाच्या पिल्लाचे प्राण वाचवत वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ८ वाजेच्या सुमारास रायसोनी नगर येथील रहिवासी संदीप यादव यांनी सर्पमित्र राजेश सोनवणे यांना फोन करून त्यांच्या घराजवळ साप निघाल्याची माहिती दिली. माहिती मिळताच राजेश सोनवणे आणि त्यांचे सहकारी तुषार करोसिया यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना घोणस जातीचे एक पिल्लू जखमी अवस्थेत आढळून आले. सदर साप अतिविषारी असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सर्पमित्र राजेश सोनवणे यांनी अत्यंत कौशल्याने व सुरक्षित पद्धतीने त्या सापाच्या पिल्लाला पकडून त्याचे प्राण वाचवले.
यानंतर जखमी घोणस सापाच्या पिल्लाला तातडीने पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले. तेथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज बोराखेडे यांनी सापावर अतिशय योग्य व प्रभावी उपचार केले. डॉक्टरांच्या तत्पर उपचारांमुळे सापाची प्रकृती सुधारण्यास मदत झाली.
वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने केलेल्या या कार्याबद्दल परिसरातील नागरिकांनी सर्पमित्र राजेश सोनवणे, त्यांचे सहकारी तुषार करोसिया तसेच डॉ. सुरज बोराखेडे यांचे कौतुक केले. पर्यावरण दिनी एका दुर्मिळ व अतिविषारी सर्पाचे प्राण वाचवून सर्पमित्र राजेश सोनवणे यांनी वन्यजीवांप्रती असलेली आपली संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
