जळगावात अवैध जुगारावर पोलिसांचा धडाका; ४ ठिकाणी छापे, ८ जण ताब्यात, ३३ हजारांची रोकड जप्त 

जळगाव शहरातील गांधी मार्केट, एमआयडीसी, आझाद नगर आणि बॉम्बे रेल्वे गेट परिसरातील अवैध जुगार व मटका अड्ड्यांवर पोलिसांनी एकाचवेळी छापे टाकून ८ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत ३३,८४० रुपयांची रोकड आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले.

 

DYSP नितीन गणापुरे आणि प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली जळगावात मोठी कारवाई; अवैध जुगार व्यवसायांवर पोलिसांचा धडाका.

जळगाव शहरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध जुगार व मटका अड्ड्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाच दिवशी चार ठिकाणी धडक छापे टाकले. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या कडक सूचनांनुसार आणि मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व प्रोबेशनरी DYSP प्रशांत दरेकर यांच्या विशेष पथकाने ही समन्वित मोहीम राबवली.

मंगळवारी (२ जून) शहरातील गांधी मार्केट, एमआयडीसी परिसर, आझाद नगर टी-पॉईंट आणि बॉम्बे रेल्वे गेट परिसरात एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत एकूण ८ जणांना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे ३३,८४० रुपयांची रोकड तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

गांधी मार्केट परिसरात मटका अड्ड्यावर कारवाई

गांधी मार्केट परिसरात सुरू असलेल्या कल्याण मटका अड्ड्यावर छापा टाकून नंदलाल गणपत बुरुजवाले (५६) आणि अशोक गोपाळ महाजन (४९) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून २,६८० रुपये रोख रक्कम तसेच मटक्याच्या स्लिप, कार्बन पेपर आणि पेन जप्त करण्यात आले.

एमआयडीसी परिसरात मोठी कारवाई

सुप्रीम कॉलनीसमोरील टपरीच्या आडोशाने सुरू असलेल्या वरली मेनबाजार सट्टा अड्ड्यावर छापा टाकून चार जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. रहीम मेहताब तडवी, निलेश लक्ष्मण सोनार, आशिक शाहा शहादत शाहा आणि दिपक राजेंद्र सोनार अशी त्यांची नावे आहेत. या ठिकाणाहून १५,७४० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

आझाद नगर टी-पॉईंट येथे कारवाई

रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आझाद नगर टी-पॉईंट परिसरात सुरू असलेल्या ‘मिलन डे’ सट्टा अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत दिपक राजाराम रणसिंगे (३८) याला ताब्यात घेऊन ६,९९० रुपये आणि सट्टा साहित्य जप्त करण्यात आले.

बॉम्बे रेल्वे गेट परिसरातही छापा

जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बॉम्बे रेल्वे गेटसमोरील पुलाखाली सुरू असलेल्या ‘मिलन डे ओपन’ सट्टा अड्ड्यावरही कारवाई करण्यात आली. यात भरत खेमसिंग गोरखा (३९) याच्याकडून ८,४३० रुपये, पावती बुक आणि पेन जप्त करण्यात आले.

या सर्व कारवायांमध्ये मिळून एकूण ३३,८४० रुपये रोख रक्कम व मोठ्या प्रमाणावर जुगार साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही संपूर्ण कारवाई DYSP नितीन गणापुरे आणि प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळुंखे यांच्या फिर्यादीवरून गुन्हे नोंदवण्यात आले असून विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. या धडक कारवाईमुळे शहरातील अवैध धंदे चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पुढील काळातही अशा मोहिमा सुरू राहतील, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!