जळगावातील आर्या हॉस्पिटलमध्ये कथित अनियमिततेप्रकरणी आठ सदस्यीय संयुक्त पथकाची तपासणी. सोनोग्राफी मशीन सील; पुढील चौकशी सुरू.
शहरातील बळीराम पेठेतील आर्या हॉस्पिटलमध्ये नियमांचे उल्लंघन करून गर्भलिंग तपासणी केली जात असल्याच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी धडक कारवाई केली. तपासणीदरम्यान अनेक गंभीर अनियमितता आढळून आल्याने पथकाने रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन तातडीने सील केले.
आर्या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग तपासणीस परवानगी नसतानाही असा प्रकार सुरू असल्याची लेखी तक्रार जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे प्राप्त झाली होती. तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष तपासणी पथकाची नियुक्ती केली.
तपासणीदरम्यान रुग्णालयातील विविध कागदपत्रे, नोंदवह्या तसेच सोनोग्राफी मशीनशी संबंधित आवश्यक प्रमाणपत्रांची पाहणी करण्यात आली. त्यावेळी काही गंभीर बाबी समोर आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तपासणीत आढळल्या गंभीर अनियमितता
पथकाच्या तपासणीत रुग्णालयात २० आठवड्यांपर्यंत गर्भपाताची परवानगी असताना २१ आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीच्या गर्भवतींचे गर्भपात केल्याचे निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले.
तसेच, रुग्णालयातील नियमित नोंदवह्या अपूर्ण असून काही महत्त्वाचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे आढळले. गर्भपात आणि गर्भलिंग तपासणीविरोधी कायद्यांबाबत जनजागृती करणारे आवश्यक फलकही दर्शनी भागात लावलेले नसल्याचे तपासणीत समोर आले.
याशिवाय, सोनोग्राफी मशीनसाठी आवश्यक असलेले ‘एमआयसी’ प्रमाणपत्र तपासणीदरम्यान डॉक्टरांना सादर करता आले नसल्याचे प्रशासनाने नमूद केले.
आठ सदस्यीय पथकाची कारवाई
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे आणि महापालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांच्यासह आठ सदस्यीय संयुक्त पथकाने रुग्णालयात तपासणी केली. तपासणीनंतर सोनोग्राफी मशीन सील करण्यात आले.
या प्रकरणातील सर्व बाबींची पुढील चौकशी सुरू असून, तपासणीत आढळलेल्या अनियमिततेच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
