माजी सरपंच किशोर महाजन व महाजन परिवाराने मातृस्मृती जपण्यासाठी नायगाव-कोठे ग्रुप ग्रामपंचायतीला शवपेटी भेट दिली. ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव.
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील महाजन परिवाराने आपल्या मातोश्रींच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. नायगाव व कोठे ग्रुप ग्रामपंचायतीला अंत्यविधी प्रसंगी उपयोगी पडणारी अत्याधुनिक शवपेटी भेट देऊन महाजन परिवाराने समाजाप्रती असलेली आपली कृतज्ञता व्यक्त केली.
नायगावचे माजी सरपंच किशोर रामू महाजन, त्यांचे बंधू व प्रगतशील शेतकरी अशोक रामू महाजन, सुश्रुत हॉस्पिटल, रावेर येथील डॉ. योगेश अशोक महाजन, साईराम कृषी केंद्राचे संचालक ऋषिकेश अशोक महाजन तसेच उच्चशिक्षित प्रगतशील शेतकरी विशाल किशोर महाजन यांनी संयुक्तपणे हा उपक्रम हाती घेतला.
गावातील नागरिकांना दुःखद प्रसंगी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदत मिळावी या सामाजिक भावनेतून ही शवपेटी ग्रामपंचायतीला सुपूर्द करण्यात आली. ग्रामीण भागात अशा सुविधा सहज उपलब्ध नसल्याने महाजन परिवाराच्या या योगदानाचे ग्रामस्थांकडून विशेष कौतुक केले जात आहे.
यावेळी आयोजित कार्यक्रमात सरपंच तथा प्रशासक सुपडाबाई भालेराव, ग्रामसेवक रविंद्र मोरे, मुरलीधर महाजन, सुधाकर महाजन यांच्यासह गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी महाजन परिवाराच्या या समाजोपयोगी कार्याचे अभिनंदन करत हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ही शवपेटी गरजू नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध राहणार असून आपत्ती किंवा दुःखद प्रसंगी गावकऱ्यांना तिचा लाभ मिळणार आहे. मातृस्मृती जपतानाच समाजसेवेचा आदर्श निर्माण करणाऱ्या महाजन परिवाराच्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र स्वागत होत आहे.
सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून केलेले हे कार्य ग्रामीण भागातील परोपकार आणि समाजसेवेचे उत्कृष्ट उदाहरण मानले जात असून महाजन परिवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डॉ. राजरत्न पोहेकर हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात.
मो. क्र. +919689653315, Email -rbpohekar@gmail.com
