जळगावात प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून कडक कारवाई, तपास सुरू.
शहरात मानवी आरोग्यास घातक असलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून सुगंधी तंबाखू व पानमसाल्याचा मोठा साठा जप्त केला असून, याप्रकरणी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवार, २१ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ४:३० वाजता जळगाव येथील शामाफायर कॉम्प्लेक्स जवळील ‘प्लांट नंबर ०५’ परिसरात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूची साठवणूक व विक्री होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी पंकज सुनील कढरे यांनी सहकाऱ्यांसह छापा टाकला.
या कारवाईत सुमारे ₹१,००,४८० किमतीचा सुगंधी तंबाखू व पानमसाल्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. हा साठा मानवी आरोग्यास अपायकारक असल्याने तो तातडीने जप्त करण्यात आला.
या प्रकरणी लखन लक्ष्मणदास हिराणी (वय २८) आणि नरेश लक्ष्मणदास हिराणी (वय ३२), दोघेही रा. सिंधी कॉलनी, जळगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रामानंद नगर पोलीस ठाणे येथे नोंदवण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
या संयुक्त कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर साठवणूक व विक्रीवर पुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
