बदलत्या हवामानामुळे फळपिकांचे नुकसान टाळण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मृग बहार फळपीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्गठित हवामान आधारित फळपीक विमा योजना २०२६-२७ अंतर्गत मृग बहारातील अधिसूचित फळपिकांसाठी विमा संरक्षण उपलब्ध करण्यात आले आहे. नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांतील द्राक्ष, डाळिंब, मोसंबी, लिंबू, पेरू, सीताफळ, चिकू, संत्रा, हळद तसेच इतर अधिसूचित फळपिकांची लागवड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांनी या योजनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
बदलत्या हवामानामुळे कमी पाऊस, पावसातील खंड, अतिवृष्टी, वाढते तापमान आणि आर्द्रता यांसारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे मोठे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा आणि उत्पादनातील जोखीम कमी व्हावी, यासाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना उपयुक्त ठरत आहे. या योजनेअंतर्गत हवामान निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे मध्ये पिकांची नोंद, ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी, आधारशी संलग्न बँक खाते आणि उत्पादनक्षम फळबाग असणे आवश्यक आहे. तसेच फळबागेचे जिओ-टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव बँक, आपले सरकार सेवा केंद्र किंवा अधिकृत ऑनलाइन पोर्टलद्वारे १४ जुलै २०२६ पूर्वी सादर करावा. जिल्हानिहाय आणि फळपिकानुसार निश्चित करण्यात आलेल्या विमा हप्त्याची रक्कम भरावी. संबंधित फळपिकानुसार जोखीमस्तर वेगवेगळा असल्याने अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“फळबाग उभारण्यासाठी अनेक वर्षांचे श्रम आणि मोठी गुंतवणूक लागते. बदलत्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या जोखमीपासून संरक्षण मिळविण्यासाठी प्रत्येक पात्र फळबागधारकाने मृग बहार फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. अंतिम मुदतीची वाट न पाहता तातडीने अर्ज सादर करावा,” असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक (नाशिक विभाग) सुभाष काटकर यांनी केले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
