सत्यम पार्क परिसरातील इलेक्ट्रिकल दुकानाला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

जळगाव शहरातील सत्यम पार्क परिसरातील दिनेश इलेक्ट्रिकल्स या दुकानाला शुक्रवारी सकाळी आग लागली. अग्निशमन दलाने वेळेत घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीत विद्युत साहित्याचे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.

जळगावात शुक्रवारी सकाळी इलेक्ट्रिकल दुकानाला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणली.

शहरातील सत्यम पार्क परिसरातील सोपाननगर, दूध फेडरेशन रोडवरील दिनेश इलेक्ट्रिकल्स या दुकानाला शुक्रवारी (१० जुलै) सकाळी अचानक आग लागली. अग्निशमन दलाने वेळेत घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अग्निशमन विभागाला सकाळी ८.५० वाजता प्राची तायडे यांनी दुकानाला आग लागल्याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन मुख्यालयातून बंब तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आला. जवानांनी पाण्याचा मारा करून काही वेळातच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले.
आगीत दुकानातील पंखे, कुलर, इलेक्ट्रिक मोटारी तसेच अन्य विद्युत साहित्य जळून खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

सदर इमारत दोन मजली असून तळमजल्यावर दुकान आणि वरच्या मजल्यावर रहिवासी वास्तव्यास आहेत. आग पसरण्यापूर्वीच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचल्याने रहिवाशांना कोणताही धोका निर्माण झाला नाही.

दुकानाचे मालक दिनेश भगवान परदेशी असून, अग्निशमन विभागाचे वाहन चालक प्रकाश चव्हाण तसेच फायरमन संजय तायडे, नितीन ससाने आणि किरण पाटील यांनी तत्परतेने काम करत आग आटोक्यात आणली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!