जळगावातील पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्था, शिरसोली येथील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, ठेवीदारांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करत कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे. मुदत ठेवींवर परतावा न मिळाल्याने संतप्त ठेवीदारांनी संबंधित संचालक मंडळाविरोधात MPID कायद्यान्वये कठोर कारवाईची मागणी साेमवार, २३ मार्च राेजी केली आहे.
तक्रारदारांनी दिलेल्या निवेदनानुसार, पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्थेत विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारण्यात आल्या. मात्र मुदत संपल्यानंतरही ठेवीदारांना त्यांच्या रकमा परत करण्यात आलेल्या नाहीत. उलट वारंवार आश्वासने देत वेळकाढूपणा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही ठेवीदारांनी सांगितले की, ४ ते ५ वर्षे उलटूनही त्यांना त्यांच्या ठेवींचा परतावा मिळालेला नाही.
तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, संस्थेचे प्रमुख व संचालक मंडळाने संगनमत करून ठेवीदारांची रक्कम विविध खाजगी कंपन्यांमध्ये गुंतवली. आशिष कॅपिटल आणि वरद इन्वेस्टमेंट या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याचा दावा करण्यात आला असून, या कंपन्यांचा संबंधही संचालकांच्या कुटुंबाशी असल्याचा आरोप आहे. या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करून ठेवीदारांची रक्कम हडप करण्यात आल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
ठेवीदारांच्या मते, सुरुवातीला काही महिन्यांपर्यंत परतावा देण्यात आला, मात्र त्यानंतर अचानक पैसे देणे बंद करण्यात आले. याशिवाय, मुदतपूर्ती झाल्यानंतरही काही दिवस रक्कम संस्थेतच ठेवावी लागेल, अशी अट घालून ठेवीदारांची दिशाभूल करण्यात आली. संस्थेचे सॉफ्टवेअर, इंटरनेट अडचणी यांसारखी कारणे देत वर्षानुवर्षे वेळ काढण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणात आणखी गंभीर बाब म्हणजे, ठेवीदारांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित संचालक व पदाधिकारी संपर्काबाहेर गेले असून, काहींनी धमकी देऊन तक्रारी करू नयेत असा दबाव टाकल्याचा आरोपही करण्यात आला आहे. “कोणालाही काही करता येणार नाही” असे सांगत ठेवीदारांना धमकावण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तक्रारदारांनी पुढे नमूद केले आहे की, या प्रकरणाची व्याप्ती शेकडो कोटी रुपयांपर्यंत असल्याची शक्यता असून, अन्य शाखांमध्येही अशाच प्रकारचे गैरव्यवहार झाले आहेत. अहिल्यानगर येथे याच संस्थेविरोधात कारवाई होऊन अटक झाल्याचा उल्लेख करत जळगावमध्येही तत्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर ठेवीदारांनी संबंधित चेअरमन, संचालक आणि व्यवस्थापक यांना अटक करून MPID कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, तसेच सर्व ठेवीदारांच्या रकमा व्याजासह परत मिळवून द्याव्यात, अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. तसेच संस्थेची सर्व कागदपत्रे जप्त करून सखोल चौकशी करण्याचीही मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. निवेदनांवर पंडीतराव पाटील, जगदिश जोशी, चित्रा आसोदेकर, राहुल चौधरी, अश्विनी जोशी, जितेश वाघ, प्रफ्फुल जोशी, पंकज चोपडे, संजय पाटील, सतीष पाटील, रामचंद्र मोरे, सर्वेश मोरे, हेमांगी जोशी, मयुर शिंदे आदींची स्वाक्षरी आहे.
#Fraud#of_depositors #sthanilsamachar

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
