जिल्ह्यात सुरू असलेल्या लग्नसराईच्या हंगामात कमर्शियल गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे केटरिंग व्यवसाय अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर खान्देश केटरिंग असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीचे निवेदन सादर करत सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष रतन सारस्वत यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, लग्नसराईच्या हंगामात केटरिंग व्यवसाय पूर्णपणे कमर्शियल गॅस सिलेंडरवर अवलंबून असतो. मात्र सध्या अचानक निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे अनेक कार्यक्रमांवर परिणाम होत असून व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
जळगाव जिल्ह्यात केटरिंग व्यवसायातून सुमारे २० हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळतो. त्यामुळे गॅस तुटवड्याचा थेट परिणाम हजारो कामगारांच्या उपजीविकेवर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, सध्याचा काळ हा व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचा असून पुढील दोन महिन्यांनंतर लग्नसराईचा हंगाम संपणार आहे. त्यानंतर काही महिन्यांसाठी व्यवसाय ठप्प राहतो. अशा परिस्थितीत आत्ताच गॅस तुटवडा निर्माण झाल्यास मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
असोसिएशनने प्रशासनाला विनंती केली आहे की, पूर्ण पुरवठा शक्य नसला तरी किमान काही प्रमाणात कमर्शियल गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून व्यवसाय सुरू ठेवता येईल आणि हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरक्षित राहील.
सध्याच्या परिस्थितीत केटरिंग व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, आधीच बुकिंग घेतलेल्या कार्यक्रमांचे नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. ग्राहकांनाही याचा फटका बसू शकतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरत आहे.
#gas_shortage #sthaniksamachar

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
