जळगाव बसस्थानकात भामट्यांचा सापळा; ‘शनी दोष’ काढण्याच्या बहाण्याने वृद्धाची फसवणूक, पोलिस तपास वेगात.
शहरातील नवीन बसस्थानक परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाला विश्वासात घेऊन ‘तुमचा शनी उतरवून देतो’ असे आमिष दाखवत दोन भामट्यांनी सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाणे येथे दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार गजानन विठोबा सजेराव (वय ६७, रा. जिल्हा बँक कॉलनी, खोटे नगर) हे २० एप्रिल रोजी पहाटे सुमारे ४ वाजता आपल्या मुलीकडे जाण्यासाठी नवीन बसस्थानकावर बसची वाट पाहत होते. त्यावेळी दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्याशी संवाद साधत “तुमच्यावर शनीचा प्रभाव आहे, आम्ही तो दूर करून देतो,” असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
यानंतर भामट्यांनी त्यांना बसस्थानकातील बंद असलेल्या पोलीस चौकीच्या आडोशाला नेले. तेथे त्यांनी सजेराव यांच्या हातातील ४.५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत अंदाजे २५,४३० रुपये) आणि खिशातील ९०० रुपये रोख असा एकूण २६,३३० रुपयांचा मुद्देमाल घेतला. त्याबदल्यात त्यांच्या हातात एक कडे देऊन मागे न पाहता पुढे चालत जाण्यास सांगितले. सजेराव पुढे गेल्यानंतर दोन्ही भामट्यांनी तिथून पळ काढला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सजेराव यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक राजेश पदमर हे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
बसस्थानकासारख्या गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
