जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील बीएलओंनी निवडणूक कामाचा वाढता ताण कमी करण्यासाठी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केले.
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी विविध प्रलंबित मागण्या आणि सातत्याने वाढत असलेल्या कामाच्या ताणाबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना विनंती अर्ज सादविला आहे. शालेय व कार्यालयीन कामकाज सांभाळून भारत निवडणूक आयोगाचे काम राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पार पाडताना अतिरिक्त कामाचा ताण वाढत असल्याचे बीएलओंनी निवेदनात नमूद केले आहे.
बीएलओंनी दिलेल्या निवेदनानुसार, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अर्थात एसआयआर तसेच त्यापूर्वीची विविध निवडणूकविषयक कामे मागील वर्षभरापासून सुरू आहेत. त्यामुळे रविवार, सार्वजनिक सुट्ट्या तसेच उन्हाळी सुट्टीच्या काळातही काम करावे लागत आहे. सातत्याने काम करावे लागत असल्याने मानसिक ताण आणि विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
एसआयआरनंतर स्वेच्छेने कार्यमुक्त करण्याची मागणी
एसआयआर प्रक्रिया पूर्ण होऊन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर बीएलओंना कामाची सक्ती न करता स्वेच्छेने कार्यमुक्त करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
तसेच जनगणनेप्रमाणे एसआयआरचे काम करणाऱ्या बीएलओंना उन्हाळी सुट्टीतील कामासाठी ४५ दिवसांची रजा आणि योग्य मानधन देण्यात यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
सुट्टीच्या दिवशी काम न देण्याची मागणी
रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बीएलओंना कोणतेही काम देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय मतदार सुनावणी आणि नोटीस बजावण्याच्या कामासाठी राज्य तसेच जिल्ह्यातील इतर बीएलओंप्रमाणे संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ कामातून पूर्ण वेळ कार्यमुक्त करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
मतदारांना सुनावणीसाठी बीएलओंच्या केंद्रावरच बोलावण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. निवडणूकविषयक कामे प्रभावीपणे पार पाडताना कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी प्रशासनाने या मागण्यांचा विचार करावा, अशी अपेक्षा बीएलओंनी व्यक्त केली आहे.
१३-जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील बीएलओंच्या स्वाक्षऱ्या
या निवेदनावर १३-जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील डॉ. व्ही. एन. पाटील, राजेंद्र देवराम कोळी, रौनक तडवी, कोमल निळकंठ तायदे, जिजाबराव प्रभाकर धनगर, विश्वनाथ सावकारे, हिंमतराव पितांबर ढवले, दीपमाळा प्रशांत सोनार, भारती हरिभाऊ सोनवणे, रेखा कमलाकर सपकाळे, रविंद्र धनसिंग पाटील, मनोज नारायण पाटील, सचिन बाबुसिंग परदेशी यांच्यासह इतर बीएलओ कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
