अंधेरी–बोरिवली रेल्वे हत्याकांडानंतर पश्चिम व मध्य रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवली. रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना संशयास्पद हालचालींची माहिती देण्याचे आवाहन केले.
पश्चिम रेल्वेवरील अंधेरी–बोरिवली दरम्यान घडलेल्या मयंक लोहार (२२) हत्याकांडानंतर रेल्वे पोलिसांनी उपनगरीय रेल्वे नेटवर्कवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठी आणि कठोर मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत संशयित प्रवाशांच्या बॅगांची कसून तपासणी केली जात असून रेल्वे स्थानकांवरील गर्दुल्ल्यांविरोधातही विशेष कारवाई करण्यात येत आहे.
दरवाजा बंद ठेवण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून २३ जून रोजी आरोपी रोशन सुवर्णा याने मयंक लोहार याची चाकूने भोसकून हत्या केली होती. या प्रकरणात वापरलेला चाकू रेल्वे पोलिसांनी जप्त केला असून आरोपीची पोलीस कोठडी ६ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. चौकशीत आरोपी गेल्या चार ते पाच महिन्यांपासून चाकू बॅगेत बाळगत असल्याचे समोर आले आहे.
या घटनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील प्रत्येक रेल्वे पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी आणि दहा कर्मचाऱ्यांची विशेष पथके सकाळ व संध्याकाळी स्थानकांवर प्रवाशांच्या बॅगांची तपासणी करत आहेत. या तपासणीत स्क्रू-ड्रायव्हर, कटर, धारदार अवजारे आणि हार्डवेअर साहित्य आढळल्याने अशा वस्तू गरज नसल्यास लोकलमधून नेऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच रेल्वे स्थानके आणि परिसरात अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या गर्दुल्ल्यांविरोधातही मोहीम तीव्र करण्यात आली आहे. गेल्या काही काळात मध्य आणि पश्चिम रेल्वे परिसरातील सुमारे ११५ गर्दुल्ल्यांवर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्रवाशांमध्ये सुरक्षेविषयक जनजागृतीसाठी समाजमाध्यमांचा वापर केला जाणार असून संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू दिसल्यास तात्काळ रेल्वे पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांनी कामासाठी लागणारी अवजारे लोकलमधून घेऊन जाणे टाळावे, असे आवाहन लोहमार्ग पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर यांनी केले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
