टीईटी पेपरफुटीवरून मनसेचा सरकारवर निशाणा; ठाण्यात व्यंगचित्रासह बॅनरबाजी

भिवंडीतील टीईटी पेपरफुटी प्रकरणानंतर ठाण्यात मनसेने व्यंगचित्रयुक्त बॅनर लावत राज्य सरकारवर टीका केली. परीक्षा गैरव्यवहारांवर कठोर कारवाई, जलदगती न्यायालयात खटला आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी मनसेचे ठाणे शहर जनहित व विधी विभाग अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी केली आहे.

टीईटी पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात मनसेने सरकारविरोधात व्यंगचित्रासह बॅनर लावले असून परीक्षा घोटाळ्यांतील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवारी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) भिवंडीतील पेपरफुटीच्या घटनेनंतर पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकारानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यात व्यंगचित्रयुक्त बॅनर लावत राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळणार, असा सवालही मनसेने उपस्थित केला आहे.

मनसेचे जनहित व विधी विभागाचे ठाणे शहराध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी नितीन कंपनी चौक परिसरात हा बॅनर लावला आहे. या बॅनरमधील उपरोधिक व्यंगचित्रातून राज्यातील वारंवार होणाऱ्या परीक्षा गैरव्यवहारांवर सरकारला जाब विचारण्यात आला आहे.

बॅनरवरील व्यंगचित्रात ‘टीईटी’ आणि ‘नीट’ परीक्षांची पाईपलाईन गळत असल्याचे दाखवण्यात आले असून, त्या गळतीतून पैशांचा पाऊस पडताना दर्शविण्यात आला आहे. दुसरीकडे एक राजकारणी “मोठ्या मोठ्या परीक्षांमध्ये अशी छोटी छोटी लीकेज होतच असतात, त्यात काय एवढं!” असे म्हणत या गंभीर प्रश्नाची खिल्ली उडवत असल्याचे चित्रण करण्यात आले आहे. हा बॅनर नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

टीईटी परीक्षेतील गैरव्यवहारांची ही पहिलीच घटना नाही. २०२० मध्ये झालेल्या टीईटी घोटाळ्यात पैसे घेऊन सुमारे ७,८०० उमेदवारांचे गुण वाढवण्यात आल्याचा आरोप झाला होता. तसेच बनावट टीईटी प्रमाणपत्रांचेही वितरण झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणात तत्कालीन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुशील खोडवेकर यांना अटक करण्यात आली होती. यापूर्वी २०१८ मध्येही अशाच प्रकारचे गैरव्यवहार समोर आले होते.

टीईटी पेपरफुटीचे सध्याचे प्रकरण अत्यंत गंभीर असून सरकारने त्याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. मात्र, २०२० च्या घोटाळ्यातील आरोपींना अद्याप शिक्षा झालेली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. यंदाच्या परीक्षेसाठी सुमारे सहा लाख उमेदवार सहभागी होणार होते. गेल्या वर्षभरापासून मेहनत घेऊन तयारी करणाऱ्या उमेदवारांना प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका बसला असून, याचा सर्वाधिक त्रास प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया स्वप्नील महिंद्रकर यांनी व्यक्त केली.

टीईटी परीक्षेचा इतिहास बघता यात यापूर्वी देखील दोन वेळा घोटाळे झाले आहेत. सरकारला याची पूर्ण कल्पना असताना देखील अशा प्रकारे परत एकदा पेपर फुटणे, हे सरकारचे व प्रशासनाचे घोर अपयश आहे. विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या घोटाळेबाजांवर वचक बसवण्यासाठी या संदर्भातील खटला ”फास्ट ट्रॅक” (जलदगती) कोर्टात चालवावा, जेणेकरून संबंधित आरोपींना लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा होईल, अशी मागणी महिंद्रकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!