आयआयटी मुंबईत न्यूक्लिअर इंजिनीअरिंगचा नवा अभ्यासक्रम; अणुऊर्जा क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ घडविण्याचा पुढाकार

देशातील अणुऊर्जा क्षेत्रासाठी कुशल अभियंते आणि संशोधक तयार करण्याच्या उद्देशाने आयआयटी मुंबईने न्यूक्लिअर इंजिनीअरिंगचा नवा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. थोरियम तंत्रज्ञान, संशोधन, उद्योग प्रशिक्षण आणि अत्याधुनिक प्रयोगशाळांच्या माध्यमातून भारताच्या स्वच्छ ऊर्जा व ऊर्जा स्वावलंबनाच्या ध्येयाला बळकटी देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

थोरियम-आधारित तंत्रज्ञान, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि उद्योग क्षेत्राशी सहकार्याच्या माध्यमातून आयआयटी मुंबई अणुऊर्जा क्षेत्रासाठी जागतिक दर्जाचे संशोधक आणि अभियंते घडविणार आहे.

देशातील अणुऊर्जा क्षेत्रात वेगाने होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईने न्यूक्लिअर इंजिनीअरिंगचा नवा अभ्यासक्रम सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अणुऊर्जा क्षेत्रासाठी जागतिक दर्जाचे संशोधक आणि कुशल अभियंते तयार करण्याच्या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असून, त्यासाठी आयआयटी मुंबईच्या एका माजी विद्यार्थ्याने आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले आहे.

हा अभ्यासक्रम संस्थेच्या ग्रीन एनर्जी अँड सस्टेनेबिलिटी हबच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून, भारताच्या स्वच्छ ऊर्जा आणि ऊर्जा स्वावलंबनाच्या उद्दिष्टांना बळकटी देण्यावर त्याचा भर असेल.

शांती कायदा २०२५ नंतर अणुऊर्जा क्षेत्रात खासगी सहभागाला चालना मिळाल्याने संशोधन, नवकल्पना आणि तांत्रिक कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हीच गरज ओळखून आयआयटी मुंबईने राष्ट्रीय ऊर्जा धोरणाशी सुसंगत असा बहुविषयक अभ्यासक्रम विकसित केला आहे. विशेष म्हणजे हा अभ्यासक्रम केवळ सैद्धांतिक शिक्षणापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष प्रयोग, संशोधन आणि उद्योग क्षेत्रातील प्रशिक्षणावरही आधारित असेल.

भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमात महत्त्वाचे स्थान असलेल्या थोरियम-आधारित तंत्रज्ञानावर या अभ्यासक्रमात विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यासाठी यांत्रिकी अभियांत्रिकी, ऊर्जा विज्ञान व अभियांत्रिकी, धातुकर्म व मटेरियल्स सायन्स तसेच विद्युत अभियांत्रिकी विभाग एकत्रितपणे काम करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बहुविषयक संशोधनाची संधी मिळणार आहे.

राष्ट्रीय प्रयोगशाळा, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्राशी सहकार्य वाढवत विद्यार्थ्यांना संशोधनासोबतच प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आयआयटी मुंबईमध्ये अत्याधुनिक न्यूक्लिअर मेजरमेंट लॅबोरेटरी उभारण्याचीही योजना आहे.

या नव्या उपक्रमामुळे अणुऊर्जा क्षेत्रातील संशोधनाला गती मिळण्यासोबतच स्वच्छ, सुरक्षित आणि ऊर्जा स्वावलंबी भारत घडविण्याच्या दिशेने महत्त्वाचे योगदान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!