एचएसआरपी अनिवार्य नियमाचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर परिवहन विभागाने कडक कारवाई सुरू केली असून, अधिकृत केंद्रांवरून तातडीने क्रमांक पाटी बसविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) नसलेल्या वाहनांविरोधात परिवहन विभागाने राज्यभर विशेष तपासणी मोहीम हाती घेतली असून, गेल्या दहा दिवसांत १५ हजार ६४५ वाहनांची तपासणी करण्यात आली. यापैकी ६ हजार ७१८ वाहनांवर नियमभंग केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, सुमारे ८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
वाहनांची ओळख सुरक्षित ठेवणे, बनावट क्रमांक पाट्यांना आळा घालणे, वाहन क्रमांकांमध्ये होणारी छेडछाड रोखणे आणि गुन्ह्यांच्या तपासात वाहनांचा मागोवा घेणे सुलभ व्हावे, या उद्देशाने परिवहन विभागाने ‘एचएसआरपी’ बसविणे अनिवार्य केले आहे. विशेषतः एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांनाही ही क्रमांक पाटी बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जुन्या वाहनांवर ‘एचएसआरपी’ बसविण्यासाठी परिवहन विभागाने तीन अधिकृत कंपन्यांची नियुक्ती केली आहे. विभागनिहाय रोझमेर्टा टेक्नॉलॉजीज लिमिटेड, रिअल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एफटीए एचएसआरपी सोल्यूशन्स प्रा. लि. या कंपन्यांमार्फत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सरकारने ‘एचएसआरपी’ बसविण्याचे अधिकृत शुल्कही निश्चित केले आहे. त्यानुसार दुचाकी वाहनांसाठी ४५० रुपये, तीनचाकींसाठी ५०० रुपये, तर हलकी मोटार वाहने तसेच मध्यम व अवजड व्यावसायिक वाहनांसाठी ७४५ रुपये (जीएसटी वगळून व फिटमेंट शुल्कासह) आकारले जात आहेत.
‘एचएसआरपी’ बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ रोजी संपल्यानंतर १ जुलैपासून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध कडक कारवाई सुरू करण्यात आली. कारवाईच्या पहिल्याच दिवशी १५४ वाहनांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी ५४ वाहनांवर ‘एचएसआरपी’ नसल्याचे आढळले. त्या वेळी संबंधित वाहनधारकांना सूचना देऊन सोडण्यात आले होते.
त्यानंतर कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून, गेल्या दहा दिवसांत १५ हजार ६४५ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ६ हजार ७१८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सुमारे ८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
परिवहन विभागाने अद्याप ‘एचएसआरपी’ बसविलेली नसलेल्या वाहनधारकांनी तातडीने अधिकृत केंद्रांवरून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवून घ्यावी, असे आवाहन केले आहे. अन्यथा पुढील काळातही राज्यभर तपासणी मोहीम सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही विभागाने दिला आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
