लैंगिक शोषण: शिंदेसेनेचा नामनिर्देशित नगरसेवकासह भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक

उलवे येथील लॉजवर पोलिसांच्या छाप्यात अल्पवयीन मुलींची सुटका; तपासात पेणमधील लोकप्रतिनिधींसह चार आरोपींना अटक करण्यात आली असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

पेण आणि नवी मुंबईला हादरवणारे लैंगिक शोषण प्रकरण उघड. लोकप्रतिनिधींची नावे समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.

 उलवे परिसरातील एका लॉजमध्ये अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलण्यात येत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी केलेल्या कारवाईत धक्कादायक लैंगिक शोषण रॅकेट उघडकीस आले असून पेणमधील शिंदे सेनेच्या नामनिर्देशित नगरसेवकासह भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर नवी मुंबई आणि रायगड परिसरात खळबळ उडाली आहे. उलवे पोलिसांनी १७ जून रोजी सेक्टर १९ येथील एका लॉजवर छापा टाकला होता.

या कारवाईत १७ आणि १४ वर्षांच्या दोन बहिणींची सुटका करण्यात आली. त्यावेळी सारिका गायकवाड (३३) हिला अटक करण्यात आली होती. पैशांचे आमिष दाखवून तिने या मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. प्राथमिक कारवाईनंतर गायकवाड हिची सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीतून प्रकरणाचे धागेदोरे रायगड जिल्ह्यातील पेण शहरापर्यंत पोहोचले. तपासादरम्यान काही व्यक्तींनी अल्पवयीन मुलींची मागणी केल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक पुरावे, चौकशीतील माहिती आणि अन्य उपलब्ध तपशीलांच्या आधारे तपासाची व्याप्ती वाढविली. तपासात पेणमधील भाजपचे माजी नगरसेवक कुणाल विकास नाईक (३१) यांनी संबंधित महिलेशी संपर्क साधून अल्पवयीन मुलींची व्यवस्था करण्यासाठी मध्यस्थाची भूमिका बजावल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. त्याचबरोबर शिंदे सेनेचे नामनिर्देशित नगरसेवक उपेंद्र अनंत कोलाडकर (३२) आणि त्यांचे दोन सहकारी प्रमोद कमल पाटील (४३) व अच्युत गजानन पाटील (४२) यांनी या अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

या माहितीच्या आधारे उलवे पोलिसांनी शनिवारी रात्री चौघांना अटक केली. अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने सर्व आरोपींना २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलणे, त्यांचे लैंगिक शोषण करणे आणि त्यासाठी आर्थिक व्यवहार केल्याच्या आरोपांवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बालकांवरील लैंगिक अत्याचार, मानवी तस्करी प्रतिबंधक कायदा आणि बाल न्याय कायद्यातील तरतुदींनुसारही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या रॅकेटचा विस्तार किती मोठा आहे, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, अल्पवयीन मुलींना या जाळ्यात कसे ओढण्यात आले आणि यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत का, याचा तपास सुरू असल्याचे उलवे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांनी सांगितले. या प्रकरणात आणखी काही संशयितांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अल्पवयीन मुलींच्या शोषणाशी संबंधित या प्रकरणामुळे रायगड आणि नवी मुंबई परिसरात खळबळ उडाली असून, लोकप्रतिनिधींची नावे समोर आल्याने प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!