बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईच्या ताब्याबाबत न्यायालयाने मुंबई पोलिसांना फटकारले असून २४ जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात दिल्लीतील तिहार कारागृहात बंद असलेल्या कुख्यात गुंड अनमोल बिश्नोईला न्यायालयासमोर हजर करण्यात अपयश आल्याबद्दल विशेष न्यायालयाने शुक्रवारी मुंबई पोलिसांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. हत्या प्रकरणासारख्या गंभीर गुन्ह्यात तपास यंत्रणेला त्यांच्या कायदेशीर जबाबदाऱ्यांची आठवण न्यायालयाने करून द्यावी लागणे दुर्दैवी असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबीयांनी अनमोल बिश्णोईचा ताबा मिळविण्याची मागणी करणाऱ्या अर्जावर सुनावणी करताना मोक्का विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी ही टिप्पणी केली. तसेच, न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करून त्याबाबतचा अहवाल २४ जुलैपर्यंत सादर करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले.
न्यायालयाने स्पष्ट केले की, आरोपीचा ताबा मिळवणे, त्याची चौकशी करणे, तपास पूर्ण करणे आणि खटला प्रभावीपणे चालवणे ही तपास यंत्रणा व कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांची प्राथमिक जबाबदारी आहे. फरारी किंवा अन्य ठिकाणी बंदिस्त असलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यासाठी न्यायालयालाच वारंवार आदेश द्यावे लागणे ही गंभीर आणि दुर्दैवी बाब असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी लेखी उत्तर सादर करत जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याचा आरोप फेटाळून लावला. कायदेशीर परवानगी मिळाल्यास अनमोल बिश्णोईचा ताबा घेण्यास आम्ही तयार आहोत, मात्र काही व्यावहारिक अडचणी असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.
यावर न्यायालयाने, संबंधित सक्षम न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपीला या प्रकरणात औपचारिक अटक करता येऊ शकते तसेच तो न्यायालयीन कोठडीत असतानाही चौकशी करण्यासाठी आवश्यक परवानगी मिळवता येते, असे स्पष्ट केले. उपलब्ध कायदेशीर पर्यायांचा तपास यंत्रणेने पुरेसा वापर न केल्याचे दिसून येत असल्याची नाराजीही न्यायालयाने व्यक्त केली.
अनमोल बिश्णोईची न्यायालयातील उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार निर्धारित सर्व कायदेशीर प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश देत न्यायालयाने पुढील सुनावणीपूर्वी त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
प्रकरण काय ?
सिद्दीकी (६६) यांची १२ ऑक्टोबर २०२४ च्या रात्री वांद्रे पूर्व येथील त्यांचा मुलगा झिशान याच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. तुरुंगात असलेला कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्णोई याचा धाकटा भाऊ अनमोल याला गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले होते. त्यानंतर, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) त्याला अटक केली होती. सध्या तो नवी दिल्लीतील तिहार तुरुंगात बंदिस्त आहे. बिश्णोई याचा ताबा घेण्यासाठी पोलिसांना आदेश द्यावेत या मागणीसाठी सिद्दीकी कुटुंबीयांनी गेल्या आठवड्यात न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, बाह्य दबावामुळे पोलीस त्याचा ताबा घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला होता.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
