भाजपा मुक्ताईनगर तालुक्याचा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी कठोर कारवाईची मागणी

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी, मुक्ताईनगर तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करणारे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले.

रक्षाताई खडसे यांच्याविषयी सोशल मीडियावर प्रसारित कथित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपच्या निषेधार्थ मुक्ताईनगरात भाजपाचे आंदोलन; प्रशासनाला कठोर कारवाईचा इशारा.

भारत सरकारच्या केंद्रीय राज्यमंत्री तथा भारतीय जनता पक्षाच्या नेत्या मा. श्रीमती रक्षाताई खडसे यांच्याविषयी सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आलेल्या अश्लील, आक्षेपार्ह आणि मानहानीकारक वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी, मुक्ताईनगर तालुक्याच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यानंतर तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक, मुक्ताईनगर यांना निवेदन देऊन संबंधित व्यक्तीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले की, नंदुरबार येथील विजय चौधरी या व्यक्तीने कथित ऑडिओ क्लिपद्वारे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याविषयी अत्यंत अश्लील, अवमानकारक आणि बदनामीकारक भाषा वापरल्याचा आरोप आहे. अशा प्रकारचे वक्तव्य केवळ एका लोकप्रतिनिधीचा अपमान नसून सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या महिलांच्या सन्मानावर आघात करणारे असून समाजात चुकीचा संदेश देणारे असल्याचे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले.

मोर्चादरम्यान पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, रक्षाताई खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघासह राज्यातील लाखो नागरिकांच्या लोकप्रिय लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्याविषयी करण्यात आलेल्या अशोभनीय वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या आहेत. महिलांविषयी अशा प्रकारची अश्लील व अवमानकारक भाषा कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

यावेळी संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) तसेच इतर लागू असलेल्या कायद्यांनुसार तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच अशा समाजविघातक व विकृत प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेणे आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.

पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई न झाल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

मोर्चात मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग

या निषेध मोर्चात भाजपा तालुका सरचिटणीस राजेंद्र सवळे, अतुल महाजन, पंकज कोळी, भाजपा जिल्हा सदस्य चंद्रकांत भोलाणे, माजी विधानसभा क्षेत्र प्रमुख ललित महाजन, वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष डॉ. प्रविण पाचपांडे, सचिन पाटील, भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष तथा नगरसेविका माधुरी सचिन पाटील, भाजपा तालुका उपाध्यक्ष कैलास वंजारी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस विशाल झाल्टे, नगरसेविका साधना बापू ससाणे, नगरसेवक नईम बागवान, कुऱ्हा भाजपा शहराध्यक्ष सागर गंगतीरे, सुनीता भालेराव, भावना महाजन, वैशाली मनोज जाधव, शितल लक्ष्मण सापधरे, इंद्रायणी प्रकाश भोई, अनुराधा योगेश चौधरी, तृप्ती तुषार राणे, स्वाती पंकज भारंबे, नारायण चौधरी, प्रशांत महाजन, बापू ससाणे, लक्ष्मण सापधरे, बाळा चिंचोले, दत्ता जोगी, अंकुश चौधरी, पंकज पाटील, पंकज सरोदे, मयूर महाजन, सोपान झाल्टे, जुबेर अली, अनिस पटेल, विनायक पाटील, अतिक खान, जावेद खान, प्रशांत जंगले, उमेश राणे, योगेश चौधरी, ललित खडसे, जानकीराम पांडे, सुनिल श्रीखंडे, विजय शिरोळे, सोमनाथ पाटील, योगेश मनसुटे, सार्थक पाटील, जयेश कारले, लखीचंद जैन, ज्ञानेश्वर ढोले, प्रदीप गोंधळी, रायसिंग चव्हाण, संदीप पाटील, शालिग्राम सोनवणे, दलपत भोई, विनोद चौधरी, देविदास दांडगे, सोपान धाडे, निलेश दैवे, राहील खान, सौरव सपकाळे यांच्यासह भारतीय जनता पार्टी मुक्ताईनगर तालुक्याचे पदाधिकारी, विविध आघाडी-सेलचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

मोर्चा शांततेत पार पडला असून निवेदनाद्वारे प्रशासनाने तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!