सुवर्णा कांबळे आणि सौरव अडागळे यांच्या आंदोलनाला यश; डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारणीसाठी लोकप्रतिनिधींचे लेखी आश्वासन.
दिवा शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, तसेच यासंदर्भातील ठराव ठाणे महापालिकेच्या महासभेत तातडीने मांडून मंजूर करावा, या मागणीसाठी समाजसेविका सुवर्णा कांबळे आणि समाजसेवक सौरव अडागळे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाची दुसऱ्या दिवशी सांगता झाली.
नगरसेवक तथा उपशहर प्रमुख शैलेश पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. दिव्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा विषय ठाणे महापालिकेच्या महासभेत मांडण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, तसेच पुतळा उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे लेखी आश्वासन त्यांनी दिले.
लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शैलेश पाटील यांनी सुवर्णा कांबळे आणि सौरव अडागळे यांना नारळपाणी देऊन उपोषणाची सांगता केली. त्यामुळे पुतळा उभारणीच्या मागणीच्या आंदोलनाला सध्या सकारात्मक वळण मिळाले असून, आता आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते, याकडे दिवावासीयांचे लक्ष लागले आहे.
यावेळी आंबेडकरी चळवळीतील दिवंगत ज्येष्ठ नेते एकनाथ भगत (बाब) यांच्या सामाजिक योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांचा पुतळा उभारणे तसेच त्यांच्या नावाने रस्त्याचे नामकरण करण्यासाठीही प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही देण्यात आली.
या आंदोलनाला दिवा शहरातील आंबेडकरी समाज, सामाजिक कार्यकर्ते, महिला मंडळे आणि शिवसैनिकांचा मोठा पाठिंबा मिळाला. आंदोलनस्थळी अजित भगत, भालचंद्र भगत, विश्वास भालेराव, बालाजी कदम, गंगाधर गायकवाड, रवी कदम, सुनील कांबळे, प्रवीण उतेकर, सरला गायकर, शिला बहिरूने, शितल बनसोडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे स्वप्न लवकर साकार व्हावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने केवळ घोषणा किंवा कागदापुरती मर्यादित न राहता त्यांची अंमलबजावणी प्रत्यक्षात व्हावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
“ही लढाई संपूर्ण दिवा शहराच्या अस्मितेची होती”
उपोषणाची सांगता झाल्यानंतर समाजसेवक सौरव अडागळे यांनी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, आंबेडकरी संघटना, महिला मंडळे, शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि दिवा शहरातील नागरिकांचे आभार मानले.
“ही लढाई केवळ आमची नव्हती, तर संपूर्ण दिवा शहराच्या अस्मितेची होती. सर्वांच्या एकजुटीमुळेच हा संघर्ष यशस्वी झाला,” अशी भावना सौरव अडागळे यांनी व्यक्त केली.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
