महाविद्यालयीन तरुणी बेपत्ता; तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा; व्हॉट्सॲपवरील संदेश व फोटोच्या आधारे नातेवाईकांची पोलिसांत तक्रार

कोलते इंजिनिअरिंग कॉलेजमधील २० वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्यानंतर मलकापूर शहर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

मलकापूरमध्ये महाविद्यालयीन तरुणी बेपत्ता प्रकरणी पोलिसांत तक्रार; व्हॉट्सॲपवरील संदेश व फोटोच्या आधारे तपासाला सुरुवात.

 येथील कोलते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी २० वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी वडोदा येथील एका तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. व्हॉट्सॲपवरील संदेश आणि प्रोफाइल फोटोच्या आधारे नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दसरखेड येथील विनोद सोपान एकडे यांची पुतणी दीक्षा राजू एकडे (वय २०) ही १५ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ८ वाजता कोलते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेली होती. मात्र, सायंकाळपर्यंत ती घरी परतली नाही. नातेवाईकांनी तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद असल्याचे आढळून आले.

यानंतर नातेवाईकांनी कॉलेजमध्ये जाऊन चौकशी केली. त्यावेळी दीक्षा हिने तिचे वडील आजारी असल्याचे सांगून दुपारी सुमारे १ वाजता कॉलेजमधून निघून गेल्याची माहिती शिक्षकांनी दिली.

दरम्यान, दीक्षाने तिच्या वडिलांच्या व्हॉट्सॲपवर ‘मी लग्न केले आहे, मी चांगली आहे आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका’ असा संदेश पाठविल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी तिने तिच्या मावशीला फोन करून रडत संवाद साधला. त्यानंतर तिचा फोन पुन्हा बंद झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

नातेवाईकांनी दीक्षाच्या व्हॉट्सॲप प्रोफाइलवरील डीपी तपासला असता, त्यावर अक्षय विठ्ठल चिकटे (रा. वडोदा, ता. मलकापूर) याच्यासोबतचा फोटो असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर विनोद एकडे यांनी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीवरून पोलिसांनी अक्षय विठ्ठल चिकटे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४०(३) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत शिंदे करीत आहेत. बेपत्ता तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!