रब्बी हंगामातील पिके काढणीच्या टप्प्यावर असतानाच जिल्ह्यात बुधवारी व शुक्रवारी अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने मोठा तडाखा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील २०१ गावांतील सुमारे ३,८०२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, मलकापूर तालुका सर्वाधिक प्रभावित ठरला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यांसह गारपीट झाली.देऊळगाव राजा, लोणार आणि चिखली तालुक्यांना गारपिटीचा मोठा फटका बसला. लोणार तालुक्यातील अजिसपूर परिसरात गारपिटीची तीव्रता सर्वाधिक नोंदवली गेली.
या अवकाळी हवामानामुळे मका, ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, बाजरी, तसेच केळी, पपई, संत्रा, मोसंबी आणि आंबा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सिंदखेड राजा आणि मेहकर तालुक्यांत तुलनेने कमी नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
तालुकानिहाय नुकसान
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. त्यात
- बुलढाणा – १४ गावे, १४५ हेक्टर
- चिखली – १८ गावे, ७१२ हेक्टर
- मोताळा – १६ गावे, १०२ हेक्टर
- मलकापूर – ४२ गावे, ७४० हेक्टर (सर्वाधिक)
- खामगाव – २० गावे, १४८ हेक्टर
- शेगाव – २ गावे, २१० हेक्टर
- जळगाव जामोद – ४१ गावे, १५० हेक्टर
- संग्रामपूर – ११ गावे, ७० हेक्टर
- लोणार – १० गावे, १९० हेक्टर
- देऊळगाव राजा – १२ गावे, ५३० हेक्टर
पुढील हवामान अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. काही भागांत विजांच्या कडकडाटाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
या अवकाळी संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
