मलकापूर– तालुक्यात अचानक झालेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. दि. १९ मार्च रोजी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सध्या रब्बी हंगाम सुरू असून मका, गहू, हरभरा, कांदा या पिकांसह आंब्याच्या बहरालाही या वादळाचा मोठा फटका बसला आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक पिके जमीनदोस्त झाली असून काढणीच्या उंबरठ्यावर असलेली पिके आडवी पडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान अधिक वाढले आहे.
शेतकऱ्यांनी महागडी बियाणे, खते व रासायनिक औषधांचा वापर करून पिकांची मेहनतीने जोपासना केली होती. मात्र अवकाळी पावसामुळे ही सर्व मेहनत वाया गेल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर आणखी एक मोठे संकट कोसळले आहे.
या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसानीचे मूल्यांकन करावे तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.
