जाधव साहिल, पांढरे परमेश्वर, बुलाणी नेहल व तावर नम्रता यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी घेतली सायबर सुरक्षेची शपथ.
ज्ञानप्रकाश शैक्षणिक व सामाजिक प्रकल्पात दररोज होणारी प्रार्थना सभा ही ‘विचारसभा’ म्हणून ओळखली जाते. या विचारसभेत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, पर्यावरण तसेच आरोग्यविषयक बाबींवर संवादात्मक चर्चा केली जाते. याच उपक्रमांतर्गत सध्याच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगातील सायबर सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन क्विक हील फाउंडेशनच्या सहकार्याने इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा विषयावर एकदिवसीय जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले.
आज मोबाईल, इंटरनेट आणि समाजमाध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचा योग्य वापर न केल्यास आर्थिक तसेच मानसिक नुकसान होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, सोशल मीडिया वापरातील धोके आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूक करण्याच्या उद्देशाने हे सत्र घेण्यात आले.
या सत्रात राजर्षी शाहू महाविद्यालयातील जाधव साहिल, पांढरे परमेश्वर, बुलाणी नेहल आणि तावर नम्रता यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
कु. नेहल बुलाणी यांनी सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना आणि त्यांच्यावर विश्वास ठेवताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत उदाहरणांसह मार्गदर्शन केले. सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संपर्क वाढल्यामुळे अनेकदा फसवणुकीला सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे ऑनलाइन मैत्री आणि संवाद करताना सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
जाधव साहिल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत गेमिंग, पासवर्ड तसेच डिजिटल माध्यमांचा सुरक्षित वापर यातील बारकावे सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेशी संबंधित चुका टाळण्याचा निर्धार करावा, यासाठी त्यांनी संवादात्मक पद्धतीने मार्गदर्शन केले.
पांढरे परमेश्वर आणि तावर नम्रता यांनीही सायबर सुरक्षेशी संबंधित विविध मुद्द्यांवर समयोचित मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी डिजिटल माध्यमांचा वापर करताना जागरूक राहणे, वैयक्तिक माहितीची सुरक्षितता जपणे आणि ऑनलाइन जगातील संभाव्य धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेची शपथ घेतली. डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने आणि सुरक्षितपणे वापर करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
या वेळी मुख्याध्यापिका तथा संचालिका नरहरे मॅडम, शिक्षकवृंद तसेच इयत्ता आठवी ते दहावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत प्रत्यक्ष उदाहरणे आणि संवादाच्या माध्यमातून मिळालेले हे मार्गदर्शन त्यांच्या डिजिटल साक्षरतेसाठी उपयुक्त ठरले.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
