ठाण्यात वाढदिवसाचा बॅनर दुचाकीवर कोसळला; प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गावरील तीन हात नाका परिसरात पादचारी उड्डाणपुलावर लावलेला वाढदिवसाचा बॅनर अचानक सुटून दुचाकीवर कोसळला. दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखून वाहनावर नियंत्रण मिळवल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली असून सार्वजनिक ठिकाणी लावल्या जाणाऱ्या बॅनर्सच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ठाण्यातील वर्दळीच्या तीन हात नाका परिसरात बॅनर कोसळण्याच्या घटनेनंतर सार्वजनिक ठिकाणी लावल्या जाणाऱ्या बॅनर्सच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

 ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गावरील तीन हात नाका परिसरात पादचारी उड्डाणपुलावर लावलेला वाढदिवसाचा मोठा बॅनर सोमवारी अचानक सुटून रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीवर कोसळला. दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखत वाहनावरील नियंत्रण कायम ठेवल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर नेहमीप्रमाणे वाहनांची मोठी वर्दळ सुरू असताना हा प्रकार घडला. जोरदार वाऱ्यामुळे पादचारी उड्डाणपुलावरील बॅनर तुटून खाली पडला आणि त्याचवेळी तेथून जात असलेल्या दुचाकीस्वाराच्या अंगावर कोसळला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दुचाकीस्वाराचा काही क्षण तोल गेला आणि अपघाताची भीती निर्माण झाली. मात्र, त्याने शांतपणे वाहनावर नियंत्रण मिळवल्याने मोठी जीवितहानी टळली. या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

घटनेनंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिक आणि इतर वाहनचालकांनी तातडीने धाव घेत रस्त्यावर पडलेला बॅनर बाजूला हटवला. त्यामुळे काही मिनिटांत वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

या घटनेनंतर सार्वजनिक ठिकाणी लावल्या जाणाऱ्या बॅनर्सच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पादचारी उड्डाणपुलावर एवढा मोठा बॅनर कोणाच्या परवानगीने लावण्यात आला, तो लावताना सुरक्षिततेचे निकष पाळले गेले होते का, तसेच त्याची नियमित तपासणी करण्यात आली होती का, याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

तीन हात नाका परिसर हा ठाण्यातील अत्यंत वर्दळीचा मार्ग असून येथे दिवस-रात्र हजारो वाहने धावतात. अशा ठिकाणी निष्काळजीपणे लावलेले बॅनर्स नागरिकांच्या जीवितासाठी धोकादायक ठरू शकतात. काही सेकंदांचा फरक पडला असता तर या घटनेचे गंभीर अपघातात रूपांतर झाले असते, अशी प्रतिक्रिया वाहनचालकांनी व्यक्त केली.

दरम्यान, नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावणाऱ्यांवर तसेच त्यांना परवानगी देणाऱ्या संबंधित यंत्रणांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच पादचारी उड्डाणपूल, उड्डाणपूल आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या सर्व अनधिकृत बॅनर्सची तातडीने तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!