एव्हरशाईन परिसरात महापालिकेच्या बसचा अपघात; ३० हून अधिक प्रवाशांना धक्का, प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.
वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरला जोरदार धडक लागून मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. वसई पूर्वेतील एव्हरशाईन रस्त्यावर सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातात १५ हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले. धडकेच्या तीव्रतेमुळे बसमधील ३० हून अधिक प्रवाशांना मोठा हादरा बसला.
वसई-विरार महापालिकेच्या परिवहन विभागाची वसई स्टेशन ते वसई फाटा या मार्गावरील बस एव्हरशाईन परिसरात पोहोचताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यानंतर बस थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरवर आदळली.
अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की अनेक प्रवाशांचे डोके, तोंड आणि नाक पुढील सीटवर आपटल्याने त्यांना दुखापत झाली. जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या अपघातासाठी चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित यंत्रणांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत
या घटनेनंतर वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेतील बसांची स्थिती, चालकांचे प्रशिक्षण आणि वाहतूक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर उभ्या वाहनाला बस धडकल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
