पालघर जिल्ह्यातील कासा येथे पोलिसांच्या पाठलागादरम्यान अपघात; अवैध मद्याचा साठा जप्त, चालक फरार, पोलिसांच्या कारवाईवर ग्रामस्थांनी उपस्थित केले प्रश्न.
डहाणू तालुक्यातील कासा-चारोटी परिसरात अवैध मद्यवाहतूक करणाऱ्या कारचा पोलिसांकडून पाठलाग सुरू असताना झालेल्या भीषण अपघातात चार जण जखमी झाले. सोमवारी रात्री सुमारे ८.२० वाजता कासा येथील कुरेशी दरबार परिसरात ही घटना घडली. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारोटीहून जव्हारच्या दिशेने अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या कारचा वाहतूक पोलिसाने पाठलाग सुरू केला. कारवाईच्या भीतीने चालकाने वाहनाचा वेग वाढवला. मात्र, कासा हद्दीतील खड्डेमय रस्त्यावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार ते पाच दुचाकींना आणि तेथील नागरिकांना जोरदार धडक दिली. त्यानंतर कार रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली.
या अपघातात संदेश तुकाराम कवले, मयुर सुरेश कांबेरा यांच्यासह आणखी दोघे जण जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
अपघातानंतर कारचा चालक बिलाल हा घटनास्थळावरून पसार झाला. तर कारमधील अक्षय मोहन शिरसाट याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अवैध मद्याचा साठा आढळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या कारवाईवर ग्रामस्थांचा सवाल
घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी कासा पोलीस ठाण्यात गर्दी करत पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. खड्डेमय आणि वर्दळीच्या रस्त्यावर वाहनाचा पाठलाग केल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी केला.
दरम्यान, या प्रकरणात अवैध मद्यवाहतुकीप्रकरणी तसेच अपघातासंदर्भात संबंधितांवर कोणती कारवाई होणार, याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तसेच, हा पाठलाग वरिष्ठांच्या सूचनेनुसार करण्यात आला होता का, याबाबतही स्पष्टीकरणाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून फरार चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
