‘व्यसन हा केवळ व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाचा आजार आहे,’ असे सांगत डॉ. नितीन विसपुते यांनी अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन केले.
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन अभियान सप्ताहानिमित्त ‘नशा मुक्त भारत अभियान’ अंतर्गत जळगाव जिल्ह्यात दहा दिवसीय जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम १७ जून ते २६ जून दरम्यान विविध शासकीय व सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रमसामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद जळगाव आणि चेतना व्यसनमुक्ती उपचार केंद्र, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
या अभियानाचे मार्गदर्शन समाज कल्याण अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, समाज कल्याण कार्यालय अधीक्षक तस्लिमखा तडवी आणि समाज कल्याण निरीक्षक चेतन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. तसेच चेतना व्यसनमुक्ती उपचार केंद्राचे संचालक डॉ. नितीन विसपुते यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
अभियानाच्या चौथ्या दिवशी एसटी वर्कशॉप येथील कर्मचाऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. या सत्रात डॉ. नितीन विसपुते यांनी अमली पदार्थांचे दुष्परिणाम या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
“व्यसन हा केवळ एका व्यक्तीचा आजार नसून तो संपूर्ण कुटुंबाचा आणि समाजाचा आजार आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. विसपुते यांनी समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या शेवटी एसटी वर्कशॉपच्या भोई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोशन गांधी, अक्षय देवरे, दीपक पाटील आणि उमेश कापसे यांनी विशेष योगदान दिले.
अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करून समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवण्यासाठी सुरू असलेला हा उपक्रम नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळवत आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
