महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची प्रतीक्षा; महिनाभरानंतरही २७ वस्तूंचे वाटप अपूर्ण शालेय संचासाठी तब्बल ९६ टक्के, तर वह्यांसाठी ९२ टक्के विद्यार्थी अजूनही प्रतीक्षेत

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शाळा सुरू होऊन महिनाभर उलटल्यानंतरही लाखो विद्यार्थ्यांना वह्या, गणवेश, दप्तर आणि इतर २७ प्रकारच्या शालेय साहित्याचे वितरण पूर्ण झालेले नसल्याचे चित्र.

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शालेय साहित्य वितरण रखडले. GeM प्रणालीतील विलंबामुळे लाखो विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य अद्याप मिळालेले नाही.

मुंबई महानगरपालिकेने यंदा मोठ्या उत्साहात ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा केला असला, तरी शाळा सुरू होऊन महिना उलटल्यानंतरही विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य पूर्णपणे मिळालेले नाही. जूनअखेरपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण पूर्ण होईल, असा दावा शिक्षण विभागाने केला होता. मात्र प्रत्यक्षात महापालिकेच्या ९१८ शाळांतील लाखो विद्यार्थी अजूनही २७ प्रकारच्या मोफत शालेय वस्तूंच्या प्रतीक्षेत आहेत.

महापालिकेकडून दरवर्षी विद्यार्थ्यांना दोन गणवेश, दप्तर, वह्या, पाण्याची बाटली, डबा, बूट, मोजे, पीटी युनिफॉर्म, रेनकोट किंवा छत्री, कंपास बॉक्स, स्टेशनरी, चित्रकला साहित्य, सॅनिटरी नॅपकिनसह एकूण २७ शालेय वस्तू मोफत दिल्या जातात. मात्र यंदा या साहित्याच्या खरेदी प्रक्रियेला विलंब झाल्याने वितरणही रखडले आहे.

शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, शालेय संचासाठी तब्बल ९६ टक्के, तर वह्यांसाठी ९२ टक्के विद्यार्थी अजूनही प्रतीक्षेत आहेत. छत्री, स्टेशनरी, चप्पल आणि गणवेशाचे वितरणही अत्यंत संथ गतीने सुरू आहे. मात्र रेनकोट, कंपास बॉक्स, पट्टी आणि काही चित्रकला साहित्याचे वितरण तुलनेने अधिक प्रमाणात झाले आहे.

या विलंबामुळे महापालिकेच्या सुमारे ३ लाख १० हजार विद्यार्थ्यांपैकी अडीच लाखांहून अधिक विद्यार्थी अद्याप आवश्यक शैक्षणिक साहित्यापासून वंचित आहेत.

विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत असून, वह्या नसल्यामुळे वर्गातील टिपणे घेणे, गृहपाठ पूर्ण करणे आणि नियमित अभ्यास करणे कठीण जात असल्याची तक्रार पालकांकडून करण्यात येत आहे.

‘जेम’ प्रणालीमुळे खरेदीला विलंब
यंदा प्रथमच केंद्र सरकारच्या ‘गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस’ (GeM) या ऑनलाइन प्रणालीद्वारे शालेय साहित्याची खरेदी करण्यात येत आहे. प्रत्येक वस्तूसाठी स्वतंत्र पुरवठादार असल्याने संपूर्ण खरेदी प्रक्रिया अपेक्षेपेक्षा अधिक वेळखाऊ ठरल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी एकाच पुरवठादाराकडून साहित्य खरेदी होत असल्याने वितरणात एवढा विलंब होत नव्हता.

महापालिका प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, वह्या, गणवेश आणि छत्री यांसाठी खरेदी आदेश जारी करण्यात आले असून उर्वरित साहित्याच्या खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. प्रलंबित साहित्याचे वितरण लवकरच पूर्ण करून सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य उपलब्ध करून दिले जाईल, असा दावा महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!