मुक्ताईनगर तालुक्यात योगमाया प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याला वर्षपूर्ती. हरताळे येथून वृक्षारोपण उपक्रमाची सुरुवात करत आगामी काळात जनकल्याणाचे उपक्रम राबविण्याचा संकल्प.
सामाजिक कार्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने योगमाया प्रतिष्ठानच्या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘झाडं माझ्या मुक्ताईचं’ या भव्य वृक्षारोपण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. नूतन माध्यमिक विद्यालय, हरताळे येथून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. आगामी काळात मुक्ताईनगर तालुक्यातील विविध गावांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला आहे. कडुलिंब, पिंपळ, वड, आंबा, आवळा यांसह विविध उपयुक्त व औषधी वनस्पतींच्या रोपांची लागवड करण्यावर या उपक्रमात भर देण्यात येणार आहे. केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या रोपांचे नियमित संगोपन, संरक्षण आणि संवर्धन करण्याचा प्रयत्नही करण्यात येणार असल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
योगमाया प्रतिष्ठानने मागील वर्षभरात मुक्ताईनगर तालुक्यात विविध सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, पर्यावरणीय आणि देशभक्तीपर उपक्रम राबवून समाजोपयोगी कार्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रतिष्ठानच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त मागील वर्षभरातील या सामाजिक कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच संस्थेची नोंदणी प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने प्रतिष्ठानच्या कार्याला अधिकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. वर्षपूर्तीचा हा टप्पा उत्साहात साजरा करताना आगामी काळातही समाजहित आणि जनकल्याणाच्या विविध उपक्रमांना सातत्याने चालना देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
प्रतिष्ठानच्या वर्षभरातील उपक्रमांमध्ये आदिशक्ती मुक्ताबाई यात्रोत्सव २०२६ निमित्त आयोजित करण्यात आलेले तीन दिवसीय मोफत आरोग्य शिबिर विशेष उल्लेखनीय ठरले. या शिबिरात तब्बल ९०५ भाविक व रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर गरजेनुसार मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आयोजित केलेल्या या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. 
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तालुकास्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजनही प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले. या स्पर्धेत तब्बल ५०१ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी आपल्या लेखणीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करत त्यांना अभिवादन केले. यासोबतच शिवतीर्थ येथे पोवाड्याच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना सांस्कृतिक अभिवादन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये इतिहास, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जागतिक परिचारिका दिनानिमित्त ‘उत्कृष्ट सेवा सन्मान पुरस्कार’ उपक्रम राबवून उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर येथे रुग्णसेवा बजावणाऱ्या उत्कृष्ट महिला व पुरुष परिचारिकांचा सन्मान करण्यात आला. आरोग्य क्षेत्रात रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिका आणि परिचारकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानचिन्ह देत त्यांच्या सेवाभावाला प्रतिष्ठानच्या वतीने सलाम करण्यात आला.
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रक्षाबंधनाच्या निमित्ताने ‘एक राखी देश के नाम’ हा उपक्रमही राबविण्यात आला. तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या हॅन्डमेड राख्या, शुभेच्छापत्रे तसेच सैनिकांसाठी पत्रे तयार केली. या सर्व राख्या व पत्रे योगमाया प्रतिष्ठानच्या वतीने मिलिटरी स्टेशन, भुसावळ येथे नेऊन देशाच्या जवानांना सुपूर्द करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जवानांप्रती आदर, कृतज्ञता आणि देशप्रेमाची भावना व्यक्त करणाऱ्या या उपक्रमाचेही कौतुक झाले.
या सर्व सामाजिक उपक्रमांच्या मालिकेनंतर आता ‘झाडं माझ्या मुक्ताईचं’ या वृक्षारोपण अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प प्रतिष्ठानने हाती घेतला आहे. वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करणे तसेच लावलेल्या झाडांचे संगोपन करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध भागांमध्ये स्थानिक परिस्थितीला अनुरूप वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार आहे.
योगमाया प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचा हा प्रवास पुढेही अखंड सुरू ठेवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. संस्थापक अध्यक्ष अश्विन सुरवाडे, संकेत कपले, सनत जैन, मयूर पाटील, तेजस सापधरे, मनीष महाजन, अनिल गवते, रूपेश कोळी, विश्वजित देशमुख आणि प्रवीण राठोड यांच्यासह प्रतिष्ठानच्या सदस्यांचे विविध उपक्रमांच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान राहिले आहे. सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, आरोग्यसेवा, विद्यार्थीविकास आणि देशभक्तीपर उपक्रमांना एकत्रितपणे पुढे नेत योगमाया प्रतिष्ठानने आपल्या पहिल्याच वर्षात समाजोपयोगी कार्याची दिशा निश्चित केली आहे. प्रतिष्ठानच्या या सामाजिक व पर्यावरणीय उपक्रमांचे तालुक्यातील विविध स्तरांतून कौतुक होत असून, ‘झाडं माझ्या मुक्ताईचं’ अभियानातून हरित आणि पर्यावरणपूरक मुक्ताईनगर घडविण्याच्या प्रयत्नांना नागरिकांचा सहभाग मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
