एफडीएची पारसी डेअरी फार्मवर धडक कारवाई! मरिन लाईन्स परवाना निलंबित, पालघर उत्पादन केंद्रातून लाखो रुपयांचा साठा जप्त. वाचा संपूर्ण बातमी.
प्रसिद्ध पारसी डेअरी फार्म प्रा. लि. च्या मरिन लाईन्स आणि पालघर येथील आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई केली आहे. मरिन लाईन्स येथील आस्थापनात अन्नसुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने एफएसएसएआय परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. तर पालघर येथील उत्पादन केंद्रातून सुमारे ३२ लाख १० हजार ७४१ रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, विविध अन्नपदार्थांचे आठ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
एफडीएने १४ जुलै रोजी मरिन लाईन्स येथील आस्थापनाची तपासणी केली. तपासणीत अनेक गंभीर त्रुटी उघडकीस आल्याने पदनिर्देशित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त (अन्न) यांनी १५ जुलै रोजी संबंधित आस्थापनेचा परवाना निलंबित करण्याचे आदेश जारी केले.
तपासणीत कच्च्या दुधाच्या स्वीकारासाठी स्वतंत्र संरक्षित कक्ष नसणे, उत्पादन व साठवण विभागातील भिंतींवर बुरशीची वाढ, कच्चा माल थेट जमिनीवर ठेवणे, उत्पादन विभागातील अस्वच्छता, माशांचा मोठ्या प्रमाणात वावर, कीटक व उंदीर प्रतिबंधक जाळ्यांचा अभाव, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा नसणे, कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय नोंदी अपूर्ण असणे, तसेच अनेक उत्पादनांवर वापर कालावधी व मुदत समाप्तीची माहिती नसणे अशा गंभीर त्रुटी आढळल्या. या त्रुटींमुळे अन्न दूषित होण्याची आणि ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
यामुळे व्यापक जनहित लक्षात घेऊन संबंधित आस्थापनेचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला असून, या कालावधीत उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वितरणावर बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, पारसी डेअरीचे उत्पादन केंद्र असलेल्या पालघर येथील आस्थापनावरही १४ जुलै रोजी कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३१.११ लाख रुपये किमतीचे ५,९९९ किलो कुकिंग देसी काऊ बटर, ५,७०० रुपये किमतीचे ७.५ किलो सैल पनीर तसेच ९३,९६० रुपये किमतीचे ८७ किलो कोलोस्ट्रम असा एकूण ३२.१० लाख रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला.
याशिवाय मलई पनीर, कोलोस्ट्रम, फिग्स, मलई कुल्फी, स्वीट मावा तसेच गायीचे आणि म्हशीचे तूप या अन्नपदार्थांचे एकूण आठ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. संबंधित उत्पादनांमध्ये भ्रामक लेबलिंग तसेच विहित दर्जाचे उल्लंघन झाल्याचा संशय असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
