महिला उपायुक्त सभागृहात ढसाढसा रडल्या; अधिकाऱ्यावर वैयक्तिक टीकेचा मुद्दा तापला

वसई-विरार महापालिकेच्या महासभेत नालेसफाईच्या चर्चेदरम्यान महिला उपायुक्त अर्चना दिवे यांच्यावर झालेल्या वैयक्तिक टिप्पणीमुळे त्या भावूक झाल्या. या घटनेनंतर महापौर आणि आयुक्तांनी अधिकाऱ्यांवर वैयक्तिक टीका न करण्याच्या स्पष्ट सूचना देत सभागृहात शिस्त राखण्याचे आवाहन केले.

वसई-विरार महापालिकेच्या सभागृहात अधिकाऱ्यावर झालेल्या वैयक्तिक टीकेमुळे वातावरण तापले. महिला उपायुक्त अर्चना दिवे भावूक झाल्यानंतर सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला.

 वसई विरार महापालिकेच्या महासभेत नालेसफाईच्या विषयांवर चर्चा सुरू असतानाच भाजप गटनेते यांनी संबंधित विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांच्या आडनावावरून टीकात्मक भाष्य केले. या प्रकारानंतर उपायुक्तांना अश्रू अनावर झाल्याने त्या ढसाढसा रडल्या. या घडलेल्या प्रसंगानंतर काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण होते.

सोमवारी महापालिकेच्या सभागृहात महासभा आयोजित करण्यात आली होती. या महासभेत अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, बाजार कर, रस्त्यांची कामे, सांडपाणी प्रकल्प, पाणी प्रश्न, उघाड्या (कलव्हर्ट), परिवहन सेवा व नालेसफाई अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

सभेच्या अखेरीस शहरातील नालेसफाई आणि गटार व्यवस्था या विषयावर चर्चा सुरू होती. याच दरम्यान भाजपचे नगरसेवक गणेश पाटील यांनी नालेसफाईबाबत प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी महापालिकेकडे अर्ज दाखल करून नालेसफाईच्या कामावर होणारा खर्च याबाबत माहिती मागितली होती. त्याचा खुलासा देताना त्यांनी खर्चाची आकडेवारी भर सभागृहात वाचून दाखवली. मात्र तांत्रिक अडचणीमुळे त्या खर्चाचे आकडेवारी फुगल्याचे आढळून आले होते.मात्र शून्याजवळ एक डॉट देण्याचे राहून गेल्याने हा सगळा गोंधळ झाला असल्याचे लक्षात आले.

मात्र त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे हा प्रश्न उद्भवल्याचे लोकप्रतिनिधींनी सांगितले. याच दरम्यान घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख उपायुक्त अर्चना दिवे यांना भाजप गटनेते अशोक शेळके यांनी त्यांच्या आडनावावरून टीका केली. या टिकेमुळे दुखावल्या गेलेल्या उपायुक्तांना अश्रू अनावर झाले आणि थेट सभागृहातच त्या ढसाढसा रडल्या. या घटनेमुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या सर्व प्रकारानंतर महिला नगरसेविका लोकप्रतिनिधींनी सुद्धा भूमिका घेत एखाद्या महिलेवर टीका करताना करावा असे कृत्य चुकीचे असल्याचे मत यावेळी मांडले.

महापौर अजीव पाटील यांनी देखील कामाच्या विषयी माहिती घ्या परंतु कोणत्याही अधिकाऱ्यावर वैयक्तिक टीका करू नका अशा शब्दात नगरसेवकांना सूचना केल्या.

आयुक्तांच्या कडक शब्दात सूचना

महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्या समोरच हा सर्व प्रसंग घडला. यावेळी त्यांनीही महासभेत भूमिका मांडली. मागील महासभेत आणि आताच्या महासभेत अधिकाऱ्यावर वैयक्तिक टीका केली जात असल्याचे आढळून आले आहे.एखाद्या अधिकाऱ्यावर वैयक्तिक टीका करणे अत्यंत चुकीचे आहे. प्रशासनाच्या संबंधित जर काही प्रश्न असतील तर महापालिकेचा आयुक्त म्हणून माझ्याशी बोला परंतु अशा प्रकारे अधिकाऱ्यावर वैयक्तिक टीका व टिप्पणी करून नका अशा कडक शब्दात सूचना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!